शिवसेनेच्या मनात काय चाललंय, हे सांगायला मी ज्योतिषी नाही! राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात आव्हाडांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 07:31 AM2022-02-13T07:31:20+5:302022-02-13T07:31:57+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास माजी खासदार आनंद परांजपे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे आदी उपस्थित होते.
कल्याण : आघाडी धर्म पाळणे हे ज्याच्या त्याच्या मनावर आहे. आम्ही आघाडी धर्म पाळतो. त्यांच्या मनात काय चाललं आहे, हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही, असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना नेत्यांना शनिवारी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास माजी खासदार आनंद परांजपे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे आदी उपस्थित होते. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या मेळाव्यात ताकदीने कामाला लागा, असे आवाहन आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना केले.
कल्याण-डोंबिवलीचा विकास झाला आहे का, या प्रश्नावर आव्हाड म्हणाले की, कल्याण-डोंबिवलीचा विकास हरवला आहे. मला तरी दिसला नाही. भाजपच्या विकास म्हात्रेंचे घर सोडून बाकी कुठेही विकास झालेला नाही, अशी टीका त्यांनी केली. एमआयडीसीतील कारखाने स्थलांतरित झाल्याने कामगारांचा रोजगार जाणार असल्यास त्याला माझा विरोध असल्याचे आव्हाड म्हणाले.
माजी शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्या सोबत गुप्त बैठक झाली. याविषयी ते म्हणाले की, माझे नाव जितेंद्र आव्हाड आहे. बंद खोलीत चर्चा करीत नाही. मी भोईर यांच्या घरी गणेश दर्शनाकरिता गेलो होतो. जे काही करतो ते उघडपणे करतो. शेतकरी मारहाण प्रकरणात पोलिसांवर कोणाचा दबाव होता, हे राजू पाटील यांना विचारा.
कर्नाटक सरकार कोण? -
हिजाबच्या मुद्दयावरून आव्हाड म्हणाले की, कोणी काेणता पेहराव करावा, हे ठरविणारे कर्नाटक सरकार कोण? केंद्राने मिनिस्टर फॉर ड्रेस डिझायनिंग नेमावा त्यानंतर हे प्रश्न सुटू शकतील.