कोणालाही घाबरायला मी काही ब्राह्मण नाही- दिलीप कांबळे
By admin | Published: March 13, 2017 03:43 PM2017-03-13T15:43:04+5:302017-03-13T15:43:04+5:30
कोणालाही घाबरायला मी काही ब्राह्मण नाही, मी मागासवर्गीय आहे, असं वक्तव्य सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केलं
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 13 - माझ्यामागे आंदोलने केली जात आहेत, कोणालाही घाबरायला मी काही ब्राह्मण नाही, मी मागासवर्गीय आहे, असं वक्तव्य सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचे लोकार्पणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते.
ते म्हणाले, सामाजिक न्याय विभागातील दलालांची दलाली बंद केल्याने आता काही जण माझ्या मागे आंदोलन करीत आहेत. माझ्यासमोर कोणी घोषणाबाजी केली असती, तर त्यांच्या मुस्कटात लगावली असती. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आंदोलकांना धमकीवजा इशाराच दिला आहे. कांबळे यांनी असे वक्तव्य केल्याने उपस्थितांत उलटसुलट चर्चा होती.
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने नांदेडमध्ये शनिवारी (ता. 11) पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमानंतर मंत्री आणि शासनाच्या विरोधात आंदोलन केलं होतं. याचा हवाला देत कांबळे यांनी आंदोलकांवर निशाणा साधला आहे. विकासकामात राजकारण करायचे नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. भाजपा सरकार हे गोरगरिबांचे आहे. सामाजिक न्याय विभागातील दलालांची दलाली बंद केली आहे. त्यामुळेच माझ्या बदनामीसाठी काही जण मुद्दामहून आंदोलन करत आहेत. यासंदर्भात व्हॉट्सऍपवर एक क्लिप व्हायरल करण्यात आली आहे. माझ्यासमक्ष हे आंदोलन झाले असते तर चांगलीच मुस्कटात लगावली असती. मी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत वाढलेला कार्यकर्ता आहे. मी घाबरणारा नाही, असं दिलीप कांबळे म्हणाले आहेत.
त्यानंतर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांनी कांबळेंच्या वक्तव्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. दिलीप कांबळेंचे भाषण ऐकले. निलंगा इफेक्ट इतक्या लवकर होईल, असे वाटले नव्हते. आज होळी असल्यानं मंत्री जे काही बोलले ते कोणी मनावर घेऊ नये,' असे म्हणत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिलीप कांबळेंचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र दिलीप कांबळेंच्या कोणालाही घाबरायला मी काही ब्राह्मण नाही या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.