“… मी काही त्यांची ट्रॅव्हल एजंट नाही,” फडणवीसांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 04:33 PM2022-06-28T16:33:49+5:302022-06-28T16:34:02+5:30
मला उद्धव ठाकरेंचा अभिमान वाटतो. घरातील मोठा भाऊ कसा असावा तर तो उद्धव ठाकरेंसारखा असावा असं वाटतं, उद्धव ठाकरेंच्या आवाहनावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया.
सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला साथ दिली आहे. तर दुसरीकडे बंडखोर आमदार शिवसेनेनं भाजपसोबत युती करण्याची मागणी करत आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. तसंच उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनावर त्यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं.
“मला उद्धव ठाकरेंचा अभिमान वाटतो. घरातील मोठा भाऊ कसा असावा तर तो उद्धव ठाकरेंसारखा असावा असं वाटतं. त्यांनी दाखवलेल्या भावना मनाचा मोठेपणा असतो. आज मला मा आणि बाळासाहेबांची आठवण येते. त्यांच्यातील असलेली संवेदनशील उद्धव ठाकरेंच्या कृती आणि वागण्यात दिसते. बाळासाहेबांनी सर्वांनाच प्रेम दिलंय. त्यांनी हयात असताना उद्धव ठाकरेंना त्यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून जबाबदारी दिली. जर प्रेमानं उद्धव ठाकरे करत असतील तर एक मोठं भावनिक आवाहन आहे. राजकारणात यश अपयश चढ उतार येत असतात,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
बैठका घेण्याचा अधिकार भाजपला आहेच. आमचं दडपशाहीचं सरकार कधी नव्हतं आणि कधी नसेल. भाजपला त्यांच्या बैठका घ्यायच्या असतील तो त्यांचा अधिकार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच यावेळी त्यांना फडणवीस दिल्लीत गेले आहेत आणि पुढील हालचालींना वेग आलाय असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर मी काही त्यांची ट्रॅव्हल एजंट नाही, मला माहित नाही ते कुठे आहेत, असं स्पष्ट उत्तर त्यांनी दिलं.
जीआर मायबाप जनतेसाठी
यावेळी त्यांना अनेक जीआर काढण्यावरही प्रश्न विचारण्यात आला. मायबाप जनतेसाठी जीआर असतात. त्यात कोणाचा वैयक्तिक फायदा नसतो. सामान्य जनतेसाठी सरकार आहे. सरकारचं काम जनतेची सेवा करणं असतं. जर इतके जीआर काढले आहेत, तर तुम्ही त्याचं कौतुक केलं पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.