"माझी माफक अपेक्षा आहे की..."; उपमु्ख्यमंत्री पदाबाबत श्रीकांत शिंदेंकडून अखेर स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 02:06 PM2024-12-02T14:06:25+5:302024-12-02T14:15:18+5:30

उपमुख्यमंत्री पदाबाबत चर्चा सुरु असतानाच खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

I am not in the race for the post of DCM MP Shrikant Shinde clarified | "माझी माफक अपेक्षा आहे की..."; उपमु्ख्यमंत्री पदाबाबत श्रीकांत शिंदेंकडून अखेर स्पष्टीकरण

"माझी माफक अपेक्षा आहे की..."; उपमु्ख्यमंत्री पदाबाबत श्रीकांत शिंदेंकडून अखेर स्पष्टीकरण

Shrikant Shinde : विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं असलं तरी राज्याच्या मुख्यमंत्री कोण होणार यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी करण्यात येत होती. महायुतीच्या नेत्यांमध्ये दिल्लीत झालेल्या बैठकीत भाजपने एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. मात्र भाजपने उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेतील अन्य एका नेत्याला देण्याची मागणी केल्याचे म्हटलं जात होतं. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. आता श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 

उपमुख्यमंत्रीपदासाठी श्रीकांत शिंदे यांचे नाव सुचवण्यात आल्याचे गेल्या काही दिवसांपासून म्हटलं जात होतं. गेल्या दोन दिवसांपासून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यानंतर आता श्रीकांत शिंदे यांनीच उपमुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. श्रीकांत शिंदे यांनी एक्स पोस्टमधून याबाबत भाष्य केलं आहे.

"महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत," असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं.

"लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे. माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो, परंतु बातम्या देतांना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये अशी माझी विनंती आहे. माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा," असंही श्रीकांत शिंदे म्हणाले.

श्रीकांत शिंदेंचा उपमुख्यमंत्रीपदाशी संबंध नाही - नरेश म्हस्के
 
"श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत. ते तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या आणि उपमुख्यमंत्रीपदाचा संबंध नाही. कुठल्याही पद्धतीने श्रीकांत शिंदे यांच्याकरता उपमुख्यमंत्रीपद आम्ही मागितलेलं नाही. काल एकनाथ शिंदे यांनीही ते जाहीर केलं. पण आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांच्यात तुलना करत असाल तर श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत. ते केंद्रात मंत्रीपद घेऊ शकले असते. परंतु पक्षातील वरिष्ठ खासदाराला त्यांनी मंत्रीपद दिलं आहे. त्यामुळे त्यांची आणि आदित्य ठाकरे यांची तुलना होऊ शकत नाही," असं खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं.

Web Title: I am not in the race for the post of DCM MP Shrikant Shinde clarified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.