मी सत्तेमध्ये नाही, पण सत्ताधारी पक्षात, भास्कर जाधव शिवसेनेवर नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 10:00 PM2019-12-31T22:00:35+5:302019-12-31T22:10:06+5:30
ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर नाराजांची संख्या वाढतच चालली आहे.
मुंबईः ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर नाराजांची संख्या वाढतच चालली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काही आमदारांनी मंत्रिपद न मिळाल्यानं राजीनामा देण्याची भूमिका घेतलेली होती, परंतु पक्षानं मन वळविल्यानंतर त्यांनी आपल्या भूमिकेत बदल केला. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या भास्कर जाधवांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. सत्तेमध्ये मी नाही, पण सत्ताधारी पक्षात मी आहे. वाटेल ते कौशल्य पणाला लावेन, पण विकास मात्र थांबू देणार नाही, असं एका कार्यक्रमात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना ते उद्देशून म्हणाले आहेत.
मी नाराज नाही. पण मला आश्चर्याचा धक्का बसला. विधानसभेत जे सर्व आमदार आहेत, त्या सर्वात जास्त वेळा निवडून आलेला आमदार मी आहे. मला प्रशासनाचा प्रदीर्घ काळ अनुभव आहे. मला उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळालेला आमदार आहे. मला विधिमंडळ प्रशासनाचा अनुभव आहे, असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मला पैशाचा, सत्तेचा, लाल दिव्याच्या गाडीचा अजिबात मोह नाही. उद्धव ठाकरे यांनी काही गोष्टींचे आश्वासन दिलं होतं. त्या गोष्टी जगजाहीर करायच्या नसतात. मला मंत्रिपद मिळालं नाही, पण त्यात मी कुठे कमी पडतो, पूर्वीची कटुता संपली की नाही, अशा सर्व शंका मनात होत्या. मी उद्धव ठाकरेंकडे वेळ मागितली आहे. त्यांनी वेळ दिल्यानंतर मी या सर्व शंका त्यांना विचारणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.