मी नरमलो नाही, रिक्षा आंदोलन तात्पुरतं स्थगित - राज ठाकरे
By Admin | Published: March 12, 2016 11:03 AM2016-03-12T11:03:55+5:302016-03-12T13:30:21+5:30
रिक्षा परवान्यांचे आंदोलन मागे घेतलेलं नाही, मात्र कोणीही गैरफायदा घेऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पत्रक काढून आंदोलन तात्पुरतं स्थगितं केलं आहे' असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले.
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १२ - ' रिक्षा परवान्यांचे आंदोलन मागे घेतलेलं नाही, मात्र कोणीही गैरफायदा घेऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पत्रक काढून आंदोलन तात्पुरतं स्थगितं केलं आहे' असे सांगत आपण नरमलो नसल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. ' रिक्षाला आग लावणे हा काही आमच्या पक्षाचा कार्यक्रम नव्हे तर तो अमराठी, परप्रांतीयांना काम देण्याबद्दल व्यक्त केलेला राग आहे' असे त्यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत सांगितले. यावेऴी त्यांनी राज्यातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर टीका केली.
' महाराष्ट्रातील विविध भागांत हजारो मराठी मुलं रोजगाराच्या प्रतीक्षेत असताना परप्रांतातून आलेल्यांना रिक्षा परवाने का द्यायचे? त्यांचा ठेका आपण का घ्यायचा, त्यांना पोलिस संरक्षण का द्यायचे? असा सवाल राज यांनी विचारला. राज्यातील मराठी मुलांना न्याय मिळालाच पाहिजे, त्यांनाच रोजगाराच्या संधी, रिक्षा परवाने मिळाले पाहिजेत' अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.
' नव्या रिक्षा परवान्यांच्या विरोधात सुरू केलेल्या आंदोलनास मी स्थगिती दिली असली तरी त्याचा अर्थ मी नरमलो असा होता नाही. केवळ काही राजकीय पक्षांनी किंवा समाजकंटकांनी या आंदोलनाचा फायदा घेऊ नये म्हणून तुर्तास या आंदोलनाला स्थगिती दिली आहे' असे राज यांनी स्पष्ट केले.