"संजय राऊतांचा मला अभिमान, सध्याचं राजकारण…’’, उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 03:17 PM2022-08-01T15:17:31+5:302022-08-01T15:26:24+5:30
Uddhav Thackeray Reaction on Sanjay Raut Arrest: आजचं देशातील राजकारण हे निर्घृण आणि घृणास्पद बनलेलं आहे. संजय राऊत यांचा मला अभिमान आहे. ते माझे मित्र आहेत. त्यांचा काय गुन्हा आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
मुंबई - शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर ईडीने पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अटकेची कारवाई केली आहे. ईडीने संजय राऊत यांच्याविरोधात केलेल्या कारवाईबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आजचं देशातील राजकारण हे निर्घृण आणि घृणास्पद बनलेलं आहे. संजय राऊत यांचा मला अभिमान आहे. ते माझे मित्र आहेत. त्यांचा काय गुन्हा आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
संजय राऊत यांच्यावर केलेली अटकेच्या कारवाईबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, संजय राऊत यांच्याबाबत मला नक्कीच अभिमान आहे. संजय राऊत हे माझे जुने मित्र आहेत. त्यांचा नेमका काय गुन्हा आहे. ते पत्रकार आहेत. ते शिवसैनिक आहेत. निर्भिड आहेत. मरण आलं तरी शरण जाणार नाही, त्यांचं हे वाक्य मला आवडलं, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांचं समर्थन करत त्यांच्यावर झालेल्या कारवाईवर टीका केली.
भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शिवसेनेबाबत केलेल्या विधानावरून उद्धव ठाकरे यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, सर्व प्रादेशिक पक्ष संपतील असं विधान भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली आहे. भाजपा बुद्धीपेक्षा बळाचा वापर अधिक करत आहे. भाजपामध्ये बाहेरील पक्षातून अनेक लोक येत आहेत. त्यामुळे भाजपाचा वंश कुठून सुरू झाला, हे पाहावं लागेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.