मी रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर आर पाटील.

By Admin | Published: February 16, 2015 05:03 PM2015-02-16T17:03:52+5:302015-02-16T17:03:52+5:30

आबांनी ब्लॉगच्या माध्यमातून सांगतिलेला त्यांचा राजकीय जीवनपट...

I am Rao Saheb Ramrao Patil (RR Patil) | मी रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर आर पाटील.

मी रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर आर पाटील.

googlenewsNext
>मी , आर आर …..
नमस्कार .
मी रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर आर पाटील. 
लोक मला प्रेमाने आबा म्हणतात. आणि आता तीच माझी ओळख बनलेली आहे.
 
१६  ऑगस्ट  १९५७ साली महाराष्ट्र राज्यातल्या सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यात माझा जन्म झाला. अंजनी हे माझे जन्मगाव. शिक्षण क्षेत्रातल्या मा. प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या  शाळेत मी माझ्या लहानपणी श्रमदान करून शिकलो.  पुढे सांगलीतल्याच शांतीनिकेतन महाविद्यालामध्ये मी कला शाखेची पदवी घेतली. आणि नंतर मी वकिलीचेही  शिक्षण पूर्ण केले.
 
माझ्या सुरवातीच्या राजकीय जीवनामध्ये मी प्रथम १९७९ ते १९९० पर्यंत सांगली जिल्हा परिषदेचा सदस्य होतो. नंतर  १९९०, १९९५ ,१९९९ , २००४ आणि २००९  साली मी महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलो.
 
महाराष्ट्रामध्ये ग्राम विकास मंत्री म्हणून जे गाडगे महाराज स्वच्छता अभियान मी राबवलं  त्यामुळे पवार साहेब आणि महाराष्ट्रातल्या जनतेकडून मला शाबासकी आणि प्रोत्साहन मिळालं.
 
मी स्व:त बद्दल बोलायला फार संकोची माणूस आहे. या ब्लॉगच्या  निमित्ताने मी माझ्याबद्दल जे तुम्हाला सांगतो आहे ते सांगताना सुद्धा मला फार संकोच वाटतो . गृहमंत्री म्हणून कॅबिनेट दर्जाची मोठी जबाबदारी  पवार साहेबांनी माझ्यावर दिली.  माझ्या परीने मी हे काम निष्ठेने आणि पवार साहेबांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला तो सार्थ  करण्याचा मी प्रयत्न केला . त्यात मला किती यश आले हे महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवायचे आहे. त्याबाबत मी या ब्लॉगवर काही बोलू इच्छित नाही.
 
माझ्या आयुष्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण , महाराष्ट्राचे महान लोकनेते वसंतदादा पाटील आणि माझे आदरणीय नेते आणि प्रेरणास्थान शरदचंद्र पवारसाहेब  यांचा खूप मोठा प्रभाव आहे.  त्यांनी आखून दिलेल्या वाटेवरून भयमुक्तता आणि विश्वासार्हता या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रातल्या जनतेत पोलीसांमार्फत निर्माण करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करतो आहे.
 
या व्यतिरिक्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या एका जबाबदार कार्यकर्त्याच्या  भूमिकेतून मी पक्षाच्या कार्यक्षमतेमध्ये माझी बुद्धी , क्षमता आणि मेहनत या माध्यमातून पक्षाला अधिकाधिक देण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे. त्यात मला फार यश आले अथवा नाही याबद्दल माझे नेते आणि माझे सहकारीच सांगू शकतील.
 
मला साधेपणा आवडतो. साधी, तळागाळातली  माणसे यांच्या सोबत बसून गप्पा मारायला आवडतात, त्यांची सुख-दु:खे  जाणून घ्यायला आवडतात. राज्यकर्त्या माणसाला हे खूप आवश्यक आहे असं मला व्यक्तिगतरीत्या वाटतं.
 
सत्ता, पैसे येतात आणि जातात पण जोडलेली माणसे आणि जीवाभावाचे खरे मित्र, उत्तम शरीरसंपदा हीच माणसाची खरी संपत्ती असते. या गोष्टीवरून आपल्या भोवतीच्या समाजाचा  विश्वास उडत चाललेला दिसतो याचे मला खूप वैषम्य वाटते. अश्या वेळी रेड-इंडियन्स लोकांनी अमेरिकन लोकांना उद्देशून म्हणलेली  एक म्हण मला नेहमीच आठवते. ती  म्हणजे , “जो पर्यंत शेवटचं  झाड मरत नाही, शेवटची नदी  सुकत नाही आणि शेवटचा मासा जीव टाकत नाही तो पर्यंत या माणसांना कळणार नाही की माणूस पैसे खाऊन जिवंत राहू शकत नाही.”
 
माझ्याबद्दल याहून अधिक मी लिहू इच्छित नाही. मी जसा आहे तसा आहे त्याला माझा ईलाज नाही. काहींना मी आवडतो काहींना मी आवडत नाही. ज्यांना मी आवडत नाही त्यांच्याबद्दल माझ्या मनात अजिबात द्वेष नाही.
 
माध्यमांनी मला प्रेमाच्या प्रसिद्धीचं  जसं शिखर दाखवलं आहे तसच त्यांनी मला निंदेचा तळही  दाखवला आहे. त्यामुळे आता मला गैरवाजवी टीका किंवा स्तुती बरोबर ओळखता येऊ लागलेली आहे.
 
या ब्लॉग च्या माध्यमातून जो संवाद मी आपल्याशी साधत राहीन ते शब्द आणि ती वाक्य हे माझ अधिकृत म्हणणं आहे . माझं म्हणजे  (आर आर पाटील ) याच . ते जसच्या तसं आपण छापायला माझी काही हरकत नाही.

Web Title: I am Rao Saheb Ramrao Patil (RR Patil)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.