"मला चारही बाजूंनी घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो…’’, सनसनाटी दावा करत जरांगे पाटलांचं भावूक आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 04:25 PM2024-10-12T16:25:10+5:302024-10-12T16:25:48+5:30
Manoj Jarange Patil News: मला संपवण्यासाठी अनेक षडयंत्र रचून घाट घातले जात आहे. मला चहुबाजूंनी घेरलंय. मी तुमच्यात असो वा नसो. पण माझा समाज आणि समाजाची लेकरं संपवू देऊ नका, असं भावूक आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
दसरा मेळाव्यानिमित्त बीडमधील नारायणगडावून मराठा समाजाला संबोधित करताना मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला खडेबोल सुनावतानाच काही सनसनाटी दावेही केले आहेत. मला संपवण्यासाठी अनेक षडयंत्र रचून घाट घातले जात आहे. मला चहुबाजूंनी घेरलंय. मी तुमच्यात असो वा नसो. पण माझा समाज आणि समाजाची लेकरं संपवू देऊ नका, असं भावूक आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
आज झालेल्या मराठा समाजाच्या दसरा मेळावल्या संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी इमानदार माणूस आहे. गरीबांच्या लेकरांसाठी गरीबांचंच एक लेकरू झुंजतंय. आणि त्यांना नेमकं तेच सहन होत नाही आहे. हा संपेल कधी हा प्रश्न त्यांना पडलाय. मला संपवण्यासाठी अनेक षडयंत्र रचून घाट घातले. मला पूर्ण घेरलंय. या गडावरून एकही शब्द खोटा बोलणार नाही. मला हे सांगावं लागतंय. कारण माझा नाईलाज आहे. काही गोष्टी मला माझ्या समाजासमोर सांगायच्या नाही आहेत. मला होणाऱ्या वेदना माझा समाज करत नाही. माझा त्रास माझ्या समाजाला सहन होत नाही. माझ्या समाजाचा त्रास मला सहन होत नाही. मला होणाऱ्या वेदना माझ्या चेहऱ्यावर आणत नाही. कारण माझा समाज मला त्रास झाला तर रात्रंदिवस ढसाढसा रडतोय. पण आता माझा नाईलाज आहे.
आता मात्र राज्यातल्या सगळ्या बांधवानां सांगतोय की, माझ्या समाजाच्या लेकराला तुमच्यामुळे कलंक लागू देऊ नका आणि माझ्या समाजाच्या लेकराला हरू देऊ नका, मला हे सुद्धा तुमच्याकडून वचन हवं आहे. पक्ष पक्ष करू नका. सारखं नेता नेता करू नका. समाज सांभाळा. आपली सोन्यासारखी लेकरं मोठं होण्यासाठी सांभाळा. मला चारही बाजूंनी घेरलंय. मी तुमच्यात असो वा नसो. पण माझा समाज आणि समाजाची लेकरं संपवू देऊ नका. तुमच्या लेकराच्या डोक्यावर गुलाल टाका. दुसऱ्याच्या लेकराच्या डोक्यावर गुलाल टाकण्याच्या नादात कलंक माझ्या लेकराला समाजाला लागू देऊ नका. हे मी तुम्हाला पाया पडून सांगतो, असं भावूक आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केलं.