Pankaja Munde : "मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री"; पंकजा मुंडेंनी सांगितलं त्यावेळी नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 08:13 PM2023-10-17T20:13:08+5:302023-10-17T20:38:59+5:30
BJP Pankaja Munde : "मुंडे साहेबांच्या कोणत्याही गोष्टीचा फायदा उचलणं हे माझं मुख्य ध्येय नव्हतं. त्यांचा संकल्प पूर्ण करणं हे ध्येय होते."
शिवशक्ती परिक्रमेमधून मनापासून ईश्वराचे आभार मानावेसे वाटले, कारण लोकांचं एवढं प्रेम आहे. परिक्रमेमध्ये कोणतंही मिशन नव्हतं. देवदर्शनासाठी मी निघाले, भव्यदिव्य अनुभव होता. मुंडे साहेबांना नक्की अभिमान वाटला असेल की माझ्या मुलीने शक्ती वाढवली, असं भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. लोकमत व्हिडिओचे एडिटर आशिष जाधव यांनी त्यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्री पदासह विविध विषयांवर पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे.
"मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री" हे पंकजा मुंडेंचं विधान खूप व्हायरल झालं होतं. त्याची सर्वत्र चर्चा रंगली. मात्र यावर आता पंकजा यांनी त्यावेळी नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. "मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहे असं विधान केलं होतं यावर बऱ्याचदा उत्तर दिलं आहे. हा एका कार्यक्रमातला विषय आहे. तो कार्यक्रम काँग्रेसचा होता. मंचावर काँग्रेसचे अनेक पुढारी होते आणि त्यांनी भाषण केलं की पंकजा ताई तुम्ही मुख्यमंत्री व्हाल असं वाटलं होतं कारण तुम्ही संघर्षयात्रा केली."
"ताई तुम्ही मुख्यमंत्री नाही झालात पण जनतेच्या मनात मात्र तुम्हीच मुख्यमंत्री आहात तर त्याला उत्तर देताना मी ते म्हटलं होतं. हसत-खेळत तो कार्यक्रम झाला होता. पण वेळोवेळी मी यावर उत्तर दिलं आहे. मला स्वत: हे माहीत होतं की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहेत" असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. "गोपीनाथ मुंडेंचंभाजपासोबतचं नातं चांगलं होतं, त्यांचं मोठं वलय होतं त्याचा फायदा का घेतला नाही?" यावर देखील पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितलं.
"मुंडे साहेबांच्या कोणत्याही गोष्टीचा फायदा उचलणं हे माझं मुख्य ध्येय नव्हतं. त्यांचा संकल्प पूर्ण करणं हे ध्येय होते. कधीही जातीवादाला खतपाणी घातलं नाही. लोकांचा आवाज उठवण्यासाठी डगमगायचं नाही. मुंडे साहेबांच्या वलयाचा फायदा घेणं हा माझा अजेंडाच नव्हता. वलय टिकावं आणि वाढावं हे माझं कर्तव्य आहे" असं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.