मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 10:00 AM2024-05-06T10:00:15+5:302024-05-06T10:00:49+5:30
सुनांच्या हातात कारभार गेला की सासूला फक्त आणायचे सांगतात. वाटायला या सुना असतात, अशी टोलेबाजी करीत महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना मनमुराद हसवले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : केंद्राकडून निधी आणला तरी बांधकाम विभाग, सिंचन खाते राज्याचे आहे. महावितरण राज्याचे आहे. राज्य सरकार आमची एजन्सी आहे. पैसे आणणे माझे काम आहे. मी राजकारणातील सासू आहे. अर्जुनराव (अर्जुन खोतकर) आणि अरविंदराव (अरविंद चव्हाण) माझ्या सुना आहेत. एकदा का सुनांच्या हातात कारभार गेला की सासूला फक्त आणायचे सांगतात. वाटायला या सुना असतात, अशी टोलेबाजी करीत महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना मनमुराद हसवले. गोलापांगरी (ता. जालना) येथील सभेत ते बोलत होते.
‘...तर मला आमदार करा’
केंद्रातून निधी आणला तरी तुम्ही आमचे काही केले नाही, असे कार्यकर्ते सांगतात. हाच धागा पकडून दानवे यांनी मिश्कील टोलेबाजी केली.
ते म्हणाले की, तुम्ही माझी भूमिका समजून घ्या आणि वाटत असेल तर पुढच्या निवडणुकीत अर्जुनरावांना खासदार करा आणि मला तुमचा आमदार करा. मग मी तुमच्या गावा-गावात यायला तयार आहे. ही निवडणूक विकासावर जाऊ द्या.
‘कोठे थांबायचे
ते कळते’
या सभेत माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मतभेद असले तरी कोठे थांबायचे ते कळते असे सांगत, नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान आणि दानवे यांना कॅबिनेट मंत्री करण्यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले.
‘तुम्ही आमचे बाप, आजे’
nकेंद्रात मंत्री कोण होतो. ज्याचा आजा (आजोबा) केंद्रात मंत्री होता. ज्याचा बाप केंद्रात मंत्री होता.
nया दोन सुना असल्या तरी तुम्ही (जनता) आमचे बाप, आजे आहात.
nतुम्ही ठरवा कोणाला प्रतिनिधी करायचे, असे सांगत दानवे यांनी मतदारांनी आपल्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले.