मी पोलीस दलातील गटबाजीचा बळी - सुनील पारसकर
By admin | Published: August 9, 2015 03:04 AM2015-08-09T03:04:51+5:302015-08-09T03:04:51+5:30
पोलीस खात्यातील गटबाजीतून किंवा गटागटांच्या राजकारणातून माझ्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदविण्याचे षडयंत्र रचले, असा दावा करीत निलंबित उप पोलीस महानिरीक्षक सुनील पारसकर
मुंबई : पोलीस खात्यातील गटबाजीतून किंवा गटागटांच्या राजकारणातून माझ्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदविण्याचे षडयंत्र रचले, असा दावा करीत निलंबित उप पोलीस महानिरीक्षक सुनील पारसकर यांनी दोषमुक्तीचा अर्ज सत्र न्यायालयात केला आहे. २५ वर्षीय मॉडेलच्या तक्रारीवरून पारसकर यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.
या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनावर असलेल्या पारसकर यांच्याविरोधात गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केले आहे. तूर्तास या प्रकरणाचा खटला दिंडोशी येथील सत्र न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. प्रदीप घरत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पारसकर यांनी सादर केलेल्या दोषमुक्तीच्या अर्जावर अॅड. घरत २६ आॅगस्टला युक्तिवाद करणार आहेत.
पारसकर यांनी अॅड. रिझवान मर्चंट यांच्यामार्फत हा अर्ज केला आहे. तक्रारदार तरुणीसोबत मी कधीही शरीरसंबंध ठेवलेले नाहीत. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी या तरुणीने तब्बल सात महिन्यांनी बलात्काराची तक्रार दिली. मुळात पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा नोंदवणे व्यवहार्य नाही, असा बचाव पारसकर यांनी घेतला आहे. तर पोलीस दलात सुरू असलेल्या गटबाजीच्या राजकारणातून बलात्काराचा गुन्हा नोंदवून षडयंत्र रचण्यात आल्याचा दावाही पारसकर करतात. याच आधारावर त्यांनी या गुन्ह्यातून दोषमुक्त करावे, अशी विनंती न्यायालयाला केली आहे.
तपासात पारसकर आणि तक्रारदार तरुणी एकमेकांच्या संपर्कात असल्याची बाब समोर आली होती. तरुणीच्या दाव्यानुसार पारसकरांनी बळजबरी केल्यानंतरही ती त्यांच्या संपर्कात होती. तिने त्यांना महागड्या भेटवस्तूही दिल्या होत्या. आता सरकारी पक्ष पारसकर यांच्या अर्जावर काय प्रत्युत्तर दाखल करतो व न्यायालय यावर काय निर्णय देते, याकडे पोलिसांचे लक्ष लागले आहे.