"मी माझ्या अटकेची वाट पाहतोय...", अनिल देशमुखांची पोस्ट, फडणवीसांवर हल्लाबोल!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 11:05 AM2024-09-10T11:05:27+5:302024-09-10T11:08:42+5:30
Anil Deshmukh : जुने प्रकरण उकरून काढत रेड टाकून मला अटक करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करीत आहेत, असा आरोप अनिल देशमुख यांनी केले आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने एका प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजवर हल्लाबोल केला आहे. जुने प्रकरण उकरून काढत रेड टाकून मला अटक करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करीत आहेत, असा आरोप अनिल देशमुख यांनी केले आहे. तसेच, आपण अटकेची वाट पाहत असल्याचे म्हणत अनिल देशमुख यांनी प्रतिआव्हान दिले आहे.
यासंदर्भात अनिल देशमुख यांनी एक्सवर पोस्ट लिहिली आहे. यामध्ये, देवेंद्र फडणवीस यांनी ४ वर्षापूर्वीची घटना उकरून काढीत माझ्या विरुद्ध दिल्लीच्या मदतीने सीबीआयकडून एफआयआर दाखल केली आहे. ४ वर्षांपूर्वी मी गृहमंत्री असताना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपाचे नेते गिरीष महाराज यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, हा माझ्यावर आरोप आहे, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, माझ्या माहितीनुसार, माझ्यावर रेड टाकून मला अटक करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करीत आहेत, असा गंभीर आरोप करत ज्या देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या मदतीने ईडी-सीबीआयला हाताशी धरुण महाराष्ट्राचे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणले, त्यांना मी सांगू इच्छितो की देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहत आहे, असे पोस्टद्वारे अनिल देशमुख सांगत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी 4 वर्षा पुर्वीची घटना उकरुण काढीत माझ्या विरुध्द दिल्लीच्या मदतीने CBI FIR दाखल केली आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) September 10, 2024
4 वर्षापुर्वी मी गृहमंत्री असतांना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपाचे नेते गिरीष महाराज यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, हा…
दरम्यान, कथित १०० कोटी वसुली प्रकरणी चौकशीचा ससेमिरा सुरू असतानाच आता अनिल देशमुखांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. यातच, राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच सीबीआयने गुन्हा दाखल केल्याने अनिल देशमुख यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधीच देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत.