मी आणि उद्धवजी बोललो तेच ‘ऑथेंटिक’; देवेंद्र फडणवीस यांची गुगली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 06:07 AM2019-02-25T06:07:48+5:302019-02-25T06:08:00+5:30
अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत काहीही ठरलेले नाही
मुंबई : युती कशी कशी होणार या बाबत मी आणि उद्धव ठाकरे युती झाल्याच्या दिवशी जे बोललो ते ‘ऑथेंटिक’ समजा, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाबाबत काहीही ठरलेले नाही, असे रविवारी स्पष्टपणे सूचित केले.
आगामी निवडणुकीनंतर शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर युती तोडा असे मत शिवसेनेचे नेते, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले होते. त्याला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री पदाबाबत नेमके काय ठरले आहे, असे विचारले असताना मुख्यमंत्री म्हणाले की, मी आणि उद्धव ठाकरे युती झाली त्या दिवशी जे बोललो ते अंतिम समजा. (त्या दिवशी मुख्यमंत्री पदाबाबत दोघेही काहीच बोलले नव्हते.) ‘आम्ही बोललो ते आणि चंद्रकांतदादा वा कदम यांच्या बोलण्यात काही विसंगती असेल तर आमचे बोलणे आॅथेंटिक समजा’, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही आधीही सोबतच होतो, उद्यापासूनच्या अधिवेशनातही ते दिसेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपा-शिवसेनेने युती करताना विश्वासात न घेतल्याने इतर मित्र पक्ष नाराज आहेत याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले की, ते आमच्याच सोबत आहेत. उद्या रासपाचे महादेव जानकर यांच्या निवासस्थानी या मित्रपक्षांची बैठक होणार आहे. गेल्यावेळी भाजपा-शिवसेनेने अनुक्रमे २६-२२ जागा लढविताना मित्रपक्षांना चार जागा दिल्या होत्या.
‘ईडी’च्या भीतीने शिवसेनेने युती केल्याच्या आरोपावर ते म्हणाले की, ईडीची भीती वाटावी अशी कामे विरोधकांनी आधी केलेली आहेत. त्यामुळे ईडीची भीती त्यांना वाटावी.
बीडच्या पालकमंत्र्यांना अधिकार दिल्याने पोटदुखी; धनंजय मुंडेंना टोला
चारा छावण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना नाही तर पालकमंत्र्यांना अधिकार दिले आहेत. बीडमध्येही तसेच केले ही त्यांची खरी पोटदुखी आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना हाणला. पंकजा मुंडे या बीडच्या पालकमंत्री आहेत.
पोलिसांना मारताना दिसताहेत त्यांच्यावरील गुन्हे कायम मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान पोलिसांना प्रत्यक्ष मारहाण करताना जे दिसत आहेत त्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. अन्य लोकांवरील गुन्हे मागे घेणे सुरू झाले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
त्यांच्यापेक्षा आमची चार वर्षांत जादा मदत
आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात शेतकºयांना केलेल्या मदतीपेक्षा कितीतरी जास्त मदत आम्ही चार वर्षांत केली हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीच दिली. आम्ही ३६१ कोटी रुपयांचे आदिवासींचे खावटी कर्ज माफ केले. १५ वर्षांत त्यांनी पीकविम्यापोटी १ कोटी शेतकºयांना २९३१ कोटी दिले तर आम्ही चार वर्षांत २ कोटी २६ लाख शेतकºयांना १३ हजार १३५ कोटी रुपये दिले. कर्जमाफीचे १८ हजार कोटी रुपये ४४ लाख शेतकºयांच्या खात्यात जमा झाले आहेत.
च्पीएम किसान योजनेसाठी सध्या एक कोटी शेतकरी पात्र आहेत. त्यापैकी १४ लाख ५० हजार शेतकºयांच्या खात्यात पैसे टाकणे सुरु झाले आहे, असे ते म्हणाले.
धनगर आरक्षण अंतिम टप्प्यात
धनगर समाजाला आरक्षण देण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या आरक्षणाबाबतचा अहवाल कायदेशीर कार्यवाहीसाठी राज्याच्या महाधिवक्त्यांकडे पाठविण्यात आला आहे. खुल्या प्रवर्गातील दहा टक्के आरक्षणाचा फायदा मुस्लिमांनादेखील होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
त्या जवानांच्या कुटुंबात एकास सरकारी नोकरी
पुलवामातील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील दोन जवानांच्या कुटुंबातील प्रत्येकी एकास सरकारी नोकरी दिली जाईल. तसेच दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.