नितीन गडकरींमुळेच मी मुख्यमंत्री झालो!
By admin | Published: January 2, 2017 05:13 AM2017-01-02T05:13:28+5:302017-01-02T05:13:28+5:30
नागभूषण’ हा माझ्यादृष्टीने पद्मभूषणपेक्षाही मोठा पुरस्कार आहे. याचे कारण, एक तर ही कौतुकाची थाप देणारी मंडळी माझ्या घरची आहेत आणि दुसरे म्हणजे
नागपूर : ‘नागभूषण’ हा माझ्यादृष्टीने पद्मभूषणपेक्षाही मोठा पुरस्कार आहे. याचे कारण, एक तर ही कौतुकाची थाप देणारी मंडळी माझ्या घरची आहेत आणि दुसरे म्हणजे, हा पुरस्कार मला नितीन गडकरींच्या हस्ते मिळतोय. त्यांनीच मला राजकारणात आणले म्हणून मी मुख्यमंत्री होऊ शकलो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले. तर, मुख्यमंत्रीपदाची कधीच अपेक्षा केली नव्हती आणि या विषयावरून आमच्यात कधीही मतभेद झाले नाहीत, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.नागभूषण फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा ‘नागभूषण पुरस्कार’ मुख्यमंत्री फडणवीस यांना रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर होते. मंचावर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर,
खा. अजय संचेती, महापौरप्रवीण दटके, माजी खासदार दत्ता मेघे यांच्यासह नागभूषण फाऊंडेशनचे सचिव डॉ. गिरीश गांधी, अध्यक्ष प्रभाकरराव मुंडल आदी उपस्थित होते. या सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, मला राजकारण फार करता येत नाही. जे जनहिताचे आहे ते मी करीत असतो. ते करताना परिणामांची पर्वा करीत नाही.
मी तुम्हाला शब्द देतो येत्या पाच वर्षांत विदर्भाचा चेहरा पूर्णपणे बदललेला असेल. त्यातल्यात्यात नागपूरवर माझे विशेष लक्ष आहे. कारण, हे माझे शहर आहे. माझ्या जीवनाचा शेवट याच शहरात होणार आहे. मुंबई-पुण्यासह आम्हाला अवघ्या महाराष्ट्रालाच विकासाची नवी दिशा द्यायची आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने राज्याला व्हिजन देणारा मुख्यमंत्री लाभाला आहे, अशा शब्दांत गडकरी यांनी फडणवीस यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. ते म्हणाले, सत्तेत नसताना अनेक अपमान पचवले. ब्राह्मणांचा पक्ष म्हणून हेटाळणीही सहन केली. परंतु आज सर्वाधिक ओबीसी आमच्या पक्षात आहेत. सत्ता येईल-जाईल, शेवटी तुम्ही सत्तेतून काय विचार देता हे महत्त्वाचे आहे. देवेंद्रवरही त्याच विधायक विचारांचे संस्कार झाले आहेत. म्हणूनच त्याला आज ‘नागभूषण पुरस्कार’ प्रदान करताना मला विशेष आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी घेतले गडकरींचे आशीर्वाद
शाल, श्रीफळ व एक लक्ष रुपयाचा धनादेश असे स्वरुप असलेला ‘नागभूषण पुरस्कार’ गडकरींनी मुख्यमंत्र्यांना प्रदान केल्यावर मुख्यमंत्र्यांनी गडकरींचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतला. गडकरींनीही मुख्यमंत्र्यांना कडकडून मिठी मारली. यावेळी अवघे सभागृह टाळ्यांनी दणाणून गेले.
मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा केली नाही - गडकरी
देवेंद्र मुख्यमंत्री झाले तेव्हा अनेक जण बोलत सुटले की गडकरींची संधी गेली. परंतु मुख्यमंत्री झालोच पाहिजे, अशी अपेक्षा मी कधीच बाळगली नाही. या विषयावरून आमच्यात कधी मतभेदही झाले नाहीत. हा मीडियाने फुगवलेला फुगा आहे. आम्हा दोघांमध्येही योग्य संवाद नि समन्वय आहे, याकडेही गडकरींनी भाषणात विशेष लक्ष वेधले.