मी पुन्हा आलोच, यांनाही घेऊन आलो; 'मी पुन्हा येईन'वरून टिंगल करणाऱ्यांना फडणवीसांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 01:02 PM2022-07-04T13:02:21+5:302022-07-04T13:09:10+5:30
फडणवीस म्हणाले, त्यावेळी ज्यांनी माझी टिंगल टवाळी केली, मी त्याचा बदला घेणार, 'मी त्यांना माफ केले', हाच माझा बदला आहे.
एकनाथ शिंदे सरकारने आज (सोमवारी) विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. या बहुमत चाचणीत भाजप- शिवसेना शिंदे गटाला १६४ मते मिळाली तर महाविकास आघाडीला ९९ मते मिळाली. यावेळी, सपा आणि एमआयएमचे आमदार तटस्थ राहिले. यानंतर, आभारपर भाषण करताना फडणवीस यांनी विरोधकांवर जोर दार हल्ला चढवला. "मविआचे सरकार आले, तेव्हा मी म्हणत होतो, हे सरकार अनैसर्गिक आहे. तेव्हा मी एक कवीता म्हटली होती. त्यातून 'मी पुन्हा येईन', असे म्हटले होते. पण तेव्हा माझी बरीच टिंगल टवाळी झाली. पण मी पुन्हा आलो, एकटाच आलो नाही, तर यांनाही घेऊन आलो", असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
ज्यांनी माझी टिंगल टवाळी केली, मी त्याचा बदला घेणार -
फडणवीस म्हणाले, त्यावेळी ज्यांनी माझी टिंगल टवाळी केली, मी त्याचा बदला घेणार, 'मी त्यांना माफ केले', हाच माझा बदला आहे. राजकारणात अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. कारण राजकारणात सर्वांचेच दिवस येत असतात.
सत्ता आमचे साध्य नाही, साधन आहे -
आमच्याकडे बहुमत असतानाही आम्हाला विरोधी पक्षात बसावे लागले. पण आम्ही विचलित झालो नाही. जनतेचे प्रश्न मांडले. कोरोना काळातही जनतेत राहिलो. जीवाची परवा केली नाही. अनेकांना वाटले की आम्ही सत्तेसाठी करतोय. पण आमचे साध्य सत्ता नाही. तर ते आमचे साधन आहे. जेव्हा सरकार जाईल तेव्हा पर्यायी सरकार येईल, असेही मी त्यावेळी म्हटले होते, याची आठवणही फडणवीस यांनी यावेळी करू दिली.
...त्या पक्षाने मला घरी बसण्याचाही आदेशही दिला असता तरी मी बसलो असतो -
मोदीजींनी दाखवून दिले की सत्ता महत्वाची नाही. मात्र आम्हाला बहुमत असतानाही सत्तेपासून दूर राहावे लागले. आता आम्ही, पुन्हा सरकार बनवले आणि जनतेची इच्छा पूर्ण केली. ज्या पक्षाने मला सर्वोच्च स्थानावर बसवले त्या पक्षाने मला घरी बसण्याचाही आदेशही दिला असता तरी मी बसलो असतो, असेही फडणवीस म्हणाले.
कांच के खिलौनों को उछाला नहीं जाता -
यावेळी फडणवीस यांनी एक शेरही म्हणून दाखवला... ते म्हणाले -
"यावेळी फडणवीस यांनी एक शेरही -
दुनिया का हर शौक पाला नहीं जाता
कांच के खिलौनों को उछाला नहीं जाता
मेहनत करने से मुश्किल हो जाती है आसान
क्योंकि हर काम तकदीर पर टाला नहीं जाता"