मी रेल्वे रूळ ओलांडला, पण तुम्ही धोका पत्करू नका - सचिन तेंडुलकर
By admin | Published: January 13, 2016 01:43 PM2016-01-13T13:43:38+5:302016-01-13T15:59:45+5:30
लहानपणी मीही रूळ ओलांडत असे, पण एका भयानक अनुभवानंतर मी अशी जोखीम पुन्हा पत्करली नाही, असे सांगत सचिन तेंडुलकरने प्रवाशांना रेल्वे रूळ न ओलांडण्याचे आवाहन केले.
Next
>
सुशांत मोरे
मुंबई, दि. १३ - लहानपणी क्रिकेटच्या प्रॅक्टिससाठी मी वांद्र्यावरून दादरला शिवाजी पार्क येथे असे.. क्रिकेटचा अवजड कीटचे ओझे खांद्यावर बाळगत, लोकलमध्ये धक्के खात मी रोज प्रवास करत असे. एकदा मी आणि माझ्या मित्राने प्रॅक्टिसला जाण्यापूर्वी पिक्चरला जाण्याचा प्लॅन बनवला. त्याप्रमाणे आम्ही मित्राच्या घराजवळ पिक्चर पाहिला आणि त्यानंतर प्रॅक्टिसला लवकर पोहोचता यावे म्हणून आम्ही दोघांनी रेल्वे रूळ ओलांडून दादर पश्चिमेला जाण्याचा निर्णय घेतला. क्रिकेटची जड बॅग घेऊन आम्ही रूळ ओलांडायला सुरूवात केली खरी, पण तेवढ्यात दोन्ही बाजूंनी भरधाव वेगाने लोकल ट्रेन्स येत असल्याचे आम्हाल दिसले. ते पाहून आम्ही खांद्यावरील बॅग खाली टाकली आणि दोन रेल्वे ट्रॅक्सच्या मध्ये बसून राहिलो.. अवघ्या काही क्षणांत त्या लोकल आमच्या बाजून पार झाल्या ख-या पण तेवढा काळ आम्ही जीव अक्षरश: मुठीत घेऊन बसलो होतो. तो थरारक क्षण आठवला की अजूनही माझ्या अंगावर काटा येतो... त्यानंतर मी कधीच रेल्वे रूळ ओलांडायची हिंमत केली नाही. त्यामुळे मी एकदा हा धोका पत्करला होता, पण तुम्ही कधीच रूळ ओलांडू नका असे सांगत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने प्रवाशांना सुरक्षितरित्या प्रवास करण्याचे आवाहन केले.
रेल्वे पोलिसांच्या वतीने रेल्वे प्रवाशांसाठी सुविधा आणि सुरक्षा यासाठी दोन वेगवेगळ्या योजनांचा अनावरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. वाडीबंदर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात सचिन तेंडुलकरने ‘समिप’ आणि ‘बी-सेफ’ या योजनांचे अनावरण केले.
त्या कार्यक्रमादरम्यान बोलताना सचिनने प्रवाशांना 'रेल्वे रूळ ओलांडू नका, लोकलच्या टपावरून प्रवास करू नका' असे कळकळीचे आवाहन केले. रेल्वे रूळ ओलांडण्याचबाबतचा आपला अनुभव कथन करत त्याने सचिनने प्रवाशांना जीव धोक्यात न घालण्याची विनंती केली
प्रचंड गर्दीमुळे तसेच रूळ ओलांडताना झालेल्या अपघातांमुळे गेल्या काही महिन्यांत मध्य, पश्चिम व हार्बर रेल्वेवर अनेक प्रवाशांनी आपले जीव गमावले आहेत तर अनेक प्रवासी जबर जखमीही झाले. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना वारंवार रेल्वे रूळ न ओलांडण्याचा, दारात न लटकण्याचा तसेच लोकलच्या टपावरून प्रवास न करण्याचे आवाहन करण्यात येत असते. या पार्श्वभूमीवर आता सचिननेही प्रवाशांना जीव धोक्यात न घालता सुरक्षितरित्या प्रवास करण्याचे आवाहन केले.