'त्या' रात्री मी अमित शाहांना कॉल केला; संजय राऊतांनी सांगितलं काय घडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 05:15 PM2022-02-15T17:15:02+5:302022-02-15T17:18:27+5:30
शिवसेना झुकणार नाही; खासदार संजय राऊतांचं भाजपला आव्हान
मुंबई: राज्यातलं सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. आधी आमच्या नेत्यांना लक्ष्य केलं. नंतर माझ्याकडे वळले. पण यंत्रणांना भीक घातली नाही म्हणून ईडीच्या धाडी सुरू झाल्या. काय बघायचं ते बघून घ्या. आम्हीदेखील बघून घेऊ, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला थेट आव्हान दिलं आहे.
अनिल परब, रविंद्र वायकर, भावना गवळी, आनंदराव अडसूळ या नेत्यांवर खोटे आरोप करण्यात येत आहेत. शिवसेना शरण जात नाही म्हणून यंत्रणांच्या मदतीनं कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण शिवसेना गुडघे टेकणार नाही. मला अडचणीत आणण्यासाठी कुटुंबीयांना, नातेवाईकांना चौकशीसाठी नेलं जात आहे. त्यांना १२-१४ तास ईडीच्या कार्यालयात बसवून ठेवण्यात येत आहे, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.
माझ्या निकटवर्तीयांना मध्यरात्री त्रास दिला गेला. त्यांच्या घरी ईडीचे अधिकारी पोहोचले. त्या रात्री मी अमित शाहांना कॉल केला होता. मला तुमच्याबद्दल अतिशय आदर आहे. माझ्याशी दुश्मनी आहे, तर मला अटक करा. माझे नातेवाईक, मित्र, निकटवर्तीय त्यांना का टॉर्चर करता?, असा सवाल मी त्यांना विचारला होता.
काही दिवसांपूर्वी मला भाजपचे काही नेते दिल्लीत भेटले. राज्य सरकारच्या प्रवाहातून तुम्ही बाहेर पडा. राज्यातलं सरकार पाडण्यासाठी आमची तयारी झाली आहे, असं त्यांनी मला सांगितलं. त्यावर बहुमत नसताना तुम्ही सरकार कसं पाडणार, असा सवाल मी त्यांना विचारला. त्यावर आम्ही राष्ट्रपती राजवट लागू करू किंवा काही आमदार फोडू, असं उत्तर त्यांनी दिलं. राज्य सरकारला नख लागेल असं कोणतंही कृत्य आमच्याकडून होणार नाही, असं मी त्यांना सांगितलं होतं. त्यानंतर पुढल्या काही दिवसांत माझ्या निकटवर्तीयांच्या घरी ईडीच्या धाडी पडू लागल्या, असा घटनाक्रम राऊतांनी सांगितला.