"माझा खिसा कधी कापला गेला, मलाही कळलं नाही", शरद पवारांनी सांगितला भन्नाट किस्सा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 05:29 PM2024-07-28T17:29:47+5:302024-07-28T17:32:28+5:30
Sharad Pawar : छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्येष्ठ समाजसेवक मोतीराम राठोड यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी हा किस्सा सांगितला आहे.
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आपल्या राजकीय जीवनातील अनेक किस्से आणि प्रसंग सांगत असतात. अशाच एक भन्नाट किस्सा शरद पवार यांनी रविवारी सांगितला. छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्येष्ठ समाजसेवक मोतीराम राठोड यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी हा किस्सा सांगितला आहे. यावेळी माझा खिसा कधी कापला मला कळलंच नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. हा किस्सा सांगताच उपस्थितांमध्ये जोरदार हशाही पिकला.
"काही वर्षांपूर्वी मी चाळीसगावमध्ये एका अधिवेशनासाठी गेलो होतो. त्यावेळी आयोजकांनी मला सांगितले की यावेळीच्या अधिवेशनाचं वैशिष्ट म्हणजे, यंदा या भागातील सर्व गुन्हेगार याठिकाणी एकत्र जमले आहेत. मी त्यांना गमतीने विचारलं की या गुन्हेगारांचं असं काय वैशिष्ट आहे? ते म्हणाले, तुम्हाला हे वैशिष्ट बघायचं असेल तर ते या अधिवेशनाच्या ठिकाणीच पहायला मिळेल. त्यावर मी सहज गमतीने म्हटलं, गुन्हेगार जमाती यांचं काय वैशिष्ट्य आहे. त्यावर मला म्हणाले, यातं वैशिष्ट्य तुम्हाला समारंभात, अधिवेशात बघायला मिळेल", असे शरद पवार यांनी सांगितले.
माझा खिसा कधी कापला गेला, मलाही कळलं नाही; शरद पवारांनी सांगितला भन्नाट किस्सा!#SharadPawar#politics#MaharashtraPoliticspic.twitter.com/UPsUTLvaxV
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) July 28, 2024
पुढे शरद पवार यांनी सांगितले की, "मी म्हटलं कोण लोक आहेत. त्यावर त्यांनी मला एका एकाची ओळख करून दिली. हे खिसा कापतात, हे अमुक गुन्हा करतात, ते तमुक गुन्हा करतात. ही त्यांची वैशिष्ट्य आहेत. मी विचारलं खिसा कापतात? त्यावर ते म्हणाले हो खिसा कापतात, मी म्हटलं खिसा कापताना कळत नाही का? त्यावर मला त्यांनी सांगितलं खिश्यात हात घाला, मी माझ्या खिश्यात हात घातला तर हात खाली गेला. माझा खिसा कधी कापला ते मला कळलंच नाही मुळात हे स्किल समाजातील काही घटकांमध्ये परिस्थितीमुळे आले", असे शरद पवार म्हणाले.