सदाभाऊंची घराणेशाही मला मान्य नाही - राजू शेट्टी
By admin | Published: February 13, 2017 10:05 PM2017-02-13T22:05:16+5:302017-02-13T22:05:16+5:30
गेली पंधरा वर्षे शेतकरी संघटनेचा नेता म्हणून दोन्ही काँग्रेसवाल्यांच्या घराणेशाही विरुद्ध आम्ही डंका पेटविला आणि माझाच सहकारी पुन्हा त्याच वाटेने
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 13 - गेली पंधरा वर्षे शेतकरी संघटनेचा नेता म्हणून दोन्ही काँग्रेसवाल्यांच्या घराणेशाही विरुद्ध आम्ही डंका पेटविला आणि माझाच सहकारी पुन्हा त्याच वाटेने जाणार असेल तर ते माझ्या ‘इथिक्स’ मध्ये बसत नाही, त्यामुळे सदाभाऊंची घराणेशाही मला मान्य नाही, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. लातूर येथे ते एका खासगी दूरचित्रवाहिनीशी बोलत होते. त्यानंतर ‘लोकमत’ ने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हीच भूमिका पुन्हा स्पष्टपणे मांडली.
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत हा सांगली जिल्ह्यातील बागणी (ता.वाळवा) जिल्हा परिषद मतदार संघातून रयत विकास आघाडीतून निवडणूकीस उभा आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना विचारणा केली असता शेट्टी म्हणाले,‘काँग्रेसवाल्यांच्या घराणेशाहीविरुध्द मी गेली पंधरा वर्षे डंका पेटवित आहे. आता ही सर्वच पक्षांतील अनेक नेत्यांची पोरटोरं या निवडणूकीत उभा आहेत. नेत्यांनीच आपल्या पोरांना निवडणुकीत उभे केले तर पक्षासाठी, संघटनेसाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार असा माझा सवाल आहे. त्यामुळे सदाभाऊंनी मुलाला निवडणूकीत उभे केले हे मला पटलेले नाही. कांही इथिक्स पाळून मी राजकारण करतो, त्यामध्ये हे माझ्या मनांला हे पटत नाही. सदाभाऊंनी आपल्या मुलाला उमदेवारी देवून पक्षात घराणेशाही आणली.’
खासदार शेट्टी म्हणाले,‘राज्यातील सरकारबद्दल लोकांत अस्वस्थता आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सत्तेची समीकरणे बदलतील की काय अशी शक्यता वाटत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जे मत प्रदर्शित होईल त्यावर भविष्यातील राजकारणाची दिशा निश्चित करू. आम्ही नेहमीच जनमताचा आदर केला आहे. त्यामुळे निकालाचे चिंतनही आम्ही जरूर करू. राज्यातील लोकशाही आघाडीचे भ्रष्ट सरकार उलथवून टाकण्यासाठी कांही तात्विक मतभेद असतानाही त्यावेळी भाजप सोबत गेलो. परंतु, हे सरकारच जर का शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणार नसेल तर त्या अस्वस्थेचीही दखल घ्यावी लागेल. सदाभाऊ हे संघटनेचे प्रतिनिधी म्हणून ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतानाही संघटनेने त्यांना राज्यमंत्रीपदाची संधी दिली. त्यामुळे संघटनेने सत्तेबाबत कांही वेगळा निर्णय घेतला तर तो सदाभाऊंनाही मान्य करावा लागेल.’