‘कोणालाही घाबरायला मी काही ब्राह्मण नाही
By admin | Published: March 14, 2017 07:41 AM2017-03-14T07:41:49+5:302017-03-14T07:41:49+5:30
राजकीय त्रास देण्यासाठी माझ्याविरोधात आंदोलने केली जात आहेत, कोणालाही घाबरायला मी काही ब्राह्मण नाही, मी मागासवर्गीय आहे,
लातूर : राजकीय त्रास देण्यासाठी माझ्याविरोधात आंदोलने केली जात आहेत, कोणालाही घाबरायला मी काही ब्राह्मण नाही, मी मागासवर्गीय आहे, असे विधान सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केले आहे. या जातिवाचक विधानामुळे आता नवा वाद सुरू झाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना कांबळे यांनी हे विधान केले. या कार्यक्रमाला पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते.
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने नांदेडमध्ये शनिवारी पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमानंतर मंत्री आणि शासनाच्या विरोधात आंदोलन केले होते. त्याचा हवाला देत कांबळे यांनी आंदोलकांवर निशाणा साधला.
पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांनी कांबळेंच्या विधानावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दिलीप कांबळेंचे भाषण ऐकले. निलंगा इफेक्ट इतक्या लवकर होईल, असे वाटले नव्हते. आज होळी असल्याने मंत्री जे काही बोलले ते कोणी मनावर घेऊ नये, असे म्हणत संभाजी पाटील यांनी दिलीप कांबळे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)