आईकडे जायची हिंमत नाही; भावासाठी फुटला अश्रूबांध; फोटो आल्यानंतर धनंजय देशमुख धाय मोकलून रडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 10:21 IST2025-03-05T10:16:40+5:302025-03-05T10:21:23+5:30
‘आई रोज पाहतेय... तिच्याकडे जायची हिंमत होत नाहीये...’ असे म्हणत धनंजय देशमुख यांनी भावनांना वाट मोकळी केली.

आईकडे जायची हिंमत नाही; भावासाठी फुटला अश्रूबांध; फोटो आल्यानंतर धनंजय देशमुख धाय मोकलून रडले
लोकमत न्यूज नेटवर्क, बीड/केज : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे आणि अंगावर शहारे आणणारे काही कथित फोटो सोमवारी व्हायरल झाले. त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी सकाळी मस्साजोगला देशमुख कुटुंबाची भेट घेतली.
यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांना जरांगे पाटील पाहताच अश्रू अनावर झाले. गळ्यात पडून ते धायमोकलून रडले. ‘आई रोज पाहतेय... तिच्याकडे जायची हिंमत होत नाहीये...’ असे म्हणत त्यांनी भावनांना वाट मोकळी केली. आरोपींना फाशीच व्हावी, तेव्हाच न्याय मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
‘...तर माझ्या भावाचा जीव वाचला असता’
आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हे असतानाही ते राजरोस पोलिसांसोबत फिरत होते. वेळीच त्यांच्या मुसक्या आवळल्या असत्या, तर ही घटना घडतच नव्हती. माझ्या भावाचा जीव वाचला असता. पोलिसांच्या हयगयीमुळेच ही घटना घडली असून, त्यांनाही शिक्षा व्हावी, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.
सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात येऊन त्यांची आमदारकीसुद्धा रद्द करावी. पुरवणी तपास करण्यात यावा व यात धनंजय मुंडेंना सहआरोपी करावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. घटनेत पोलिस यंत्रणा, प्रशासन दोषी आहे, असे खासदार बजरंग सोनवणे म्हणाले.
केजमध्ये टायर जाळले
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर क्रूरतेच्या निषेधार्थ आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. परळी वगळता सर्वच १० तालुक्यांत बंद पाळण्यात आला.
केजमध्ये टायर जाळण्यात आले. बीडमध्ये रॅली काढत बंदचे आवाहन केले. केज शहरातील धारूरकडे जाणाऱ्या चौकात काही लोक एकत्र आले. धनंजय मुंडे, वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे यांचे फाेटो असलेले बॅनर आणि टायर जाळण्यात आले.