मुख्यमंत्री पद अन् महाविकास आघाडीत मतभेद; शरद पवार म्हणतात, माझ्याकडे माहिती नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 01:58 PM2023-04-26T13:58:47+5:302023-04-26T14:00:12+5:30
मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर आज पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला होता.
मुंबई - राज्यात सध्या मुख्यमंत्रिपदावरून बरीच चर्चा आहे. ही चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे अजित पवार भाजपात जाणार, अजित पवार मुख्यमंत्री होणार अशा वावड्या उठल्या. त्यानंतर खुद्द अजित पवारांनीही एका मुलाखतीत मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल. २०२४ ला काय, आताही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रिपदावर दावा आहे असं विधान त्यांनी केले. त्यानंतर ठिकठिकाणी अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले.
मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर आज पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की, मुख्यमंत्री बदलाबाबत मला काही माहिती नाही. मुख्यमंत्री बदलायचा असेल तर आम्हाला कुणी सांगायचे कारण नाही. असं काही असेल तर ते माझ्या कानावर नाही. संजय राऊतांचे विधान असले तरी ते पत्रकारही आहेत. पत्रकारांना अधिक माहिती असते म्हणून ती त्यांच्याकडे असेल असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावलेत त्यांनी असा वेडेपणा करू नका असं अजित पवारांनीच प्रतिक्रिया दिल्याचे शरद पवार म्हणाले.
ठाकरेंनी दिलाय का मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव?
महाविकास आघाडी टिकावी यासाठी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला घ्या असा प्रस्ताव दिल्याची बातमी माध्यमांमध्ये छापून आली. परंतु यावर मुख्यमंत्रिपदाबाबत माझी उद्धव ठाकरेंशी चर्चा नाही. ठाकरेंनी मला प्रस्ताव दिला अशी बातमी कुणीतरी अशीच तयार केली आहे. त्याला माझ्यादृष्टीने काही महत्त्व नाही असा खुलासा पवारांनी केला आहे.
मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होईल
अजित पवारांनी प्रथमच मुख्यमंत्रीपदाबाबत इच्छा व्यक्त केली नाही. त्यामुळे अजित पवारांना माझ्या शुभेच्छा आहेत. मुख्यमंत्री होण्यास कोणाला आवडणार नाही. अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. ते अनेक वर्षापासून राजकारणात असून, मंत्रीही होते. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटते आपण मुख्यमंत्री व्हावे. पुढील मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होईल असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री
महाविकास आघाडी व्हावी हा आमचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री होईल. तसेच काही कारणांनी महाविकास आघाडी झाली नाही तर आमच्याकडे सगळे प्लॅन तयार आहेत, अशी स्पष्ट भूमिका मांडत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली आहे.