मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून...
By admin | Published: May 1, 2017 04:05 AM2017-05-01T04:05:32+5:302017-05-01T04:05:32+5:30
मी मुख्यमंत्री होऊच नये यासाठी अनेकांनी नसते उद्योग केले. या प्रकारांना मी घाबरत नाही़ पण घाणेरड्या राजकारणाचा आता कंटाळा आला
जळगाव : मी मुख्यमंत्री होऊच नये यासाठी अनेकांनी नसते उद्योग केले. या प्रकारांना मी घाबरत नाही़ पण घाणेरड्या राजकारणाचा आता कंटाळा आला आहे, अशा शब्दांत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली.
भोरगाव लेवा पंचायतचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांच्या कार्यास ५० वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा पाडळसे (ता. यावल) येथील लोकविद्यालयाच्या सभागृहात रविवारी झाला़ त्या वेळी खडसे यांनी वरील उद्गार काढले.
आपण भविष्यात राजकारणातून बाजूला गेल्यानंतर पुढे नेता कोण? उद्याचा विचार करून चांगला नेता तयार करा, असा सल्लाही खडसे यांनी यावेळी लेवा पंचायतीला दिला.
जिल्ह्यातील प्रस्थापितांनी एकही मोठा नेता होऊ दिला नाही; मात्र खडसे यास अपवाद आहेत. गेल्या सहा पंचवार्षिकपासून आपण निवडून येत आहोत. जिल्ह्यात लेवा समाजाचे पं़स़ सभापती, नगराध्यक्ष व नगरसेवकही निवडून आणल्याचे खडसे म्हणाले.
नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खडसे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून स्वपक्षाच्या मंत्र्यांनाच धारेवर धरले होते. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा सरकारला विसर पडला आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारला घरचा अहेर दिला होता.
पुणे जिल्ह्यातील भोसरी एमआयडीसीतील जमीन पत्नी व जावयाच्या नावे खरेदी केल्याचा आरोप झाल्यानंतर खडसे यांनी महसूलमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या आरोपांची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी न्या. झोटिंग यांची चौकशी समिती नेमली. या समितीचीे नागपुरात सुनावणी सुरू असून समितीच्या कार्यकक्षेबाबत खडसे यांनी घेतलेले आक्षेप फेटाळून लावण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)