मनसे-भाजपा एकत्र येऊन निवडणूक लढवणार?; राज ठाकरेंचं तीन शब्दांत उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 03:35 PM2021-12-13T15:35:26+5:302021-12-13T15:36:52+5:30
भाजप-मनसे युतीच्या प्रश्नाला राज ठाकरेंचं अवघ्या तीन शब्दांत उत्तर
नाशिक: भारतीय जनता पक्षासमोर असलेलं महाविकास आघाडीचं आव्हान, शिवसेनेनं साथ सोडल्यापासून एकाकी पडलेला भाजप आणि राज ठाकरेंनी हाती घेतलेला प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा यावरून भाजप-मनसेच्या युतीचा विषय अनेकदा चर्चेत येतो. पुढील वर्षी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी दोन्ही पक्ष याबद्दल चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. याबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरेंना नाशिकमधील पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला.
भाजप-मनसे युती होणार का, असा प्रश्न राज यांना विचारला गेला. त्यावर राज यांनी मला माहीत नाही, असं उत्तर दिलं. 'युतीच्या चर्चा तुम्हीच घडवून आणता. तुमचा सोर्स समजत नाही. अशा युतीच्या चर्चा सुरू असतील. पण त्या चर्चांबद्दल मला माहीत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
सीडीएस बिपीन रावत यांचा गेल्या आठवड्यात अपघाती मृत्यू झाला. तो अपघात होता की घातपात असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. घातपात की अपघात यावर संशय आहे. मात्र घातपात आहे असं समजलं तरी ते बाहेर येणार आहे का?, असा प्रतिप्रश्न राज यांनी केला. या देशात प्रश्न उपस्थित होतात. पण त्यांची उत्तरं मिळत नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ८१ वाढदिवस नुकताच साजरा झाला. त्याबद्दल बोलताना राज यांनी पवारांचं तोंडभरुन कौतुक केलं. शरद पवारांनी वयाची ८१ वर्ष पूर्ण केली हे चांगलं आहे. हा सहस्रचंद्र दर्शन सोहळा आहे. देश गेली ६० वर्ष शरदचंद्र दर्शन करतोय. या वयातही ते राज्यात ज्या प्रकारे फिरतात ते कौतुकास्पद आहे. राजकीय मतभेद असतात. मात्र चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. ही आपली संस्कृती आहे, अशा शब्दांत राज यांनी पवारांवर स्तुतीसुमनं उधळली.