Eknath Shinde : "मला निवडून यायला कोणत्याही निशाणीची गरज नाही कारण..."; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 11:02 AM2022-08-03T11:02:33+5:302022-08-03T11:16:10+5:30
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठं विधान केलं आहे. "निवडून येण्यासाठी मला चिन्हाची गरज नाही" असं म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांचीही ताकद वाढताना दिसत आहे. दुसरीकडे पडलेल्या भगदाडातून पक्षाला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे प्रचंड सक्रीय झाले आहेत. याच दरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठं विधान केलं आहे. "निवडून येण्यासाठी मला चिन्हाची गरज नाही" असं म्हटलं आहे.
"माझ्यावर काही लोकं आरोप लावतात... एकनाथ शिंदेने हे पाप केलं, पण मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की, मला निवडून यायला कोणत्याही निशाणीची गरज लागत नाही, एवढं काम मी माझ्या मतदार संघात करून ठेवलं आहे" असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. सासवडमधील सभेत शिंदेंनी त्यांच्यावर सातत्याने होणाऱ्या टीकेला हे उत्तर दिलं आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदार, माजी मंत्री उदय सामंत यांच्या मोटारीवर शिवसैनिकांनी मंगळवारी रात्री कात्रज चौकात हल्ला केला. या दगडफेकीत सामंत यांच्या मोटारीची काच फुटली. घडलेल्या प्रकारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
"गाडीवर दगड मारून पळून जाणे ही मर्दुमकी नाही. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे आहे. ते पोलीस करतील. ज्यांनी भ्याड हल्ला केला, त्यांच्यावर पोलीस कायदेशीर कारवाई करतील. याबाबत मी पोलिसांशी बोलतो. कायदा सुव्यवस्था राखणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे", असे ते म्हणाले. उदय सामंत यांची गाडी सिग्नलला थांबली होती. ती पाहिल्यावर शिवसैनिकांनी गद्दार गद्दार म्हणत गाडीवर चपला, दगड, बाटल्या फेकल्या. त्यात गाडीची काच फुटली. हा प्रकार पाहताच पोलीस तातडीने सामंत यांच्या मोटारीला वाट करुन दिली.
उदय सामंत म्हणाले, "माझ्या गाडीवर झालेला हा भ्याड हल्ला आहे, गाडी सिग्नलला थांबली असताना २० ते २५ जणांनी माझ्या गाडीवर हल्ला केला. त्यांच्या हातात दगड व बेसबॉल स्टिक्स होत्या. हा हल्ला म्हणजे पुर्वनियोजित षडयंत्र आहे. मला आदित्य साहेबांची सभा आहे याची कल्पना नाही. माझी गाडी केवळ सिग्नलला थांबली होती. त्यावेळी ठरवून हा हल्ला झाला. मी कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही.याबाबत मी मुख्यमंत्री महोदय यांच्या कानावर घातले आहे, माझ्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात पोलिसांनी कारवाई करावी", अशी मागणी उदय सामंत यांनी केली.