"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 22:40 IST2025-04-21T22:39:17+5:302025-04-21T22:40:31+5:30
"मी जेव्हा शालेय जीवनात पाचवी-सहावीत असताना, आम्ही जेव्हा मित्र-मित्र भांडायचो, तेव्हा आम्ही एकमेकांना, सांगायचो की, "तू याच्याशी बोलायचे नाही, त्याच्याशी बोलायचे नाही." असे काही राजकारणात होईल, असे मला वाटत नाही. कारण राज ठाकरे हे एक स्वाभिमानी नेतृत्व आहे; ते अशा अटीसमोर झुकू शकते असे मला वाटत नाही."

"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात का? यासंदर्भात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. खरे तर, एका मुलाखतीतून सर्वप्रथम मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र येण्याच्या विषयावर (शिवसेना-मनसे) मतभेद विसरण्यासंदर्भात भाष्य केले आणि नंतर त्याला साद देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्राच्या हिताचा हवाला देत किरकोळ वाद मागे ठेवण्याचे संकेत दिले. पण याच वेळी सोबत येण्यासाठी काही अटीही घातल्या. यानंतर आता, शिवसेना (शिंदे गट) नेते उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. त्यांना (राज ठाकरे) झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, असे सामंत यांनी म्हटले आहे.
सामंत म्हणाले, "माझ्या माहितीप्रमाणे, राज ठाकरे हे सध्या परदेशात आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ती जी मुलाखत आहे, ती दीड महिनापूर्वीची आहे. त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी काय घ्यायचा, हा लोकशाहीतील मुद्दा आहे. मात्र, माझे वैयक्तिक मत असे आहे की, राज ठाकरे यांचा एक वेगळा विचार आहे, त्यांचे एक वेगळे अस्तित्व आहे आणि ते एखाद्या विषयावर ठाम राहतात, हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे. यामुळे, त्यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही. कारण पहिल्या दिवशीच्या अटी काय होत्या? देवेंद्रजींसोबत बोलायचे नाही, एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलायचे नाही, कुणाबरोबर जेवायला जायचे नाही, अमित शहा साहेबांकडे बघायचे नाही, मोदी साहेबांचा फोटो लावायचा नाही. म्हणजे, हे अगदी मी जेव्हा शालेय जीवनात पाचवी-सहावीत असताना, आम्ही जेव्हा मित्र-मित्र भांडायचो, तेव्हा आम्ही एकमेकांना, सांगायचो की, "तू याच्याशी बोलायचे नाही, त्याच्याशी बोलायचे नाही." असे काही राजकारणात होईल, असे मला वाटत नाही. कारण राज ठाकरे हे एक स्वाभिमानी नेतृत्व आहे; ते अशा अटीसमोर झुकू शकते असे मला वाटत नाही." सामंत एबीपी माझासोबत बोलत होते.
याचवेळी, "कालची जी काही मुलाखत आहे, त्यावरून जे राजकीय रणकंदन निर्माण झाले आहे, त्यात मी शिवसेनेची भूमिका सांगितलेली नाही. मी माझी वैयक्तिक भूमिका सांगितली. जे मी राज साहेबांना ओळखतो किंवा त्यांच्याबद्दल वाचलंय अथवा त्यांच्या बद्दल ऐकलंय. कुठल्याही अटी-शर्तीला अधीन राहून राज साहेब स्वतःला झुकवतील, असे मला वाटत नाही," असेही उदय सामंत म्हणाले.