मी कुणाच्याही फोनची वाट पाहत नाही; छत्रपती उदयनराजे भोसले स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 02:34 PM2022-12-02T14:34:51+5:302022-12-02T14:40:32+5:30
गेल्या काही दिवसापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
गेल्या काही दिवसापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही यावरुन टीका केली आहे. या वक्तव्याचा निषेध म्हणून ३ डिसेंबर रोजी रायगड किल्ल्यावर जनआक्रोशचे आयोजन करण्यात आले आहे.या संदर्भात आज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली.
मी महाराजांचा झालेला अपमान कधीही सहन करु शकत नाही, या लोकांच आपल्यावर मोठे उपकार आहेत. राज्यासाठी त्यांचे योगदान आहे. यासाठी आम्ही उद्या रायगडला जाणार आहे. आमच्या वेगना मांडण्याचे तेच एकमेव ठिकाण आहे, असंही उदयनराजे भासले म्हणाले.
'मी कुणाच्याही फोनची वाट पाहत नाही, राज्यपालांनी केलेले वक्तव्य गंभीर आहे. माझ्याशी या संदर्भात कोणीही बोलले नाहीत, त्यांना जे योग्य वाटत ते करतात. मला जे योग्य वाटत ते मी करतो, असंही खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.
3 डिसेंबर रोजी रायगड किल्ल्यावर जनआक्रोश करणार
उदयनराजे भोसले म्हणाले, हा दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तरी परवडलं असत. असे बोलत असताना उदयनराजेंना अश्रू अनावर झाले. येत्या 3 डिसेंबर रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर आक्रोश व्यक्त करणार आहोत. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करायची नसेल तर त्यांचे नाव घेण्याचा कुणाला अधिकार नाही. असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
भारत मोठी लोकशाही असला तरी तुकडे होण्यास किती वेळ लागणार
ज्या ज्या वेळेस महाराजांची अवहेलना केली जाते. त्या त्या वेळी राग कसा येत नाही. सर्वच पक्षाचा मूळ अजेंडा हा शिवरायांचे विचार आहेत. तसं नसेल तर शिवरायांचे नाव तरी का घेता. भावी पिढीसमोर काय इतिहास ठेवणार. चुकीचा इतिहास ठेवला तर येणाऱ्या पिढीला हाच खरा इतिहास वाटेल. राष्ट्रद्रोहाच्या कायद्यासोबतच महापुरुषांचा अपमान होणार नाही याबद्दलही कायदा करावा. इतिहासासोबत अशीच छेडछाड सुरू राहिली. तर भारत देश जगातील सर्वात मोठी लोकशाही असला तरी तुकडे होण्यास किती वेळ लागणार आहे.