'महाराष्ट्राला भिकारी म्हणणाऱ्याला मी महाराष्ट्रातून हद्दपार करते'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 03:55 PM2019-10-13T15:55:56+5:302019-10-13T16:00:46+5:30
एक धरण फुटलं होतं, तेव्हा महाराष्ट्रातील एका मंत्र्यानं उत्तर दिलं की ते खेकड्यानं फोडलं होतं.
उस्मानाबाद - मी दिल्लीत काम करते, मी विरोधकांवर जास्त बोलत नाही. महाराष्ट्रात सगळं दादा बघतो, राहुल बघतात. कधीतरी कुणी नारळ फोडायला बोलवतं, ते भाग्यच माझं. मला माहितही नव्हत भूम-परंडा-वाशी मतदारसंघातून राहुल मोटेंविरुद्ध कोण उभा आहे. मला, इथं आल्यावरच समजलं, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांना अधिक महत्त्व नसल्याचं दाखवून दिलंय.
काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे वाशी-भूम -परांडा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचारार्थ खासदार सुप्रियाताई सुळे यांनी वाशी येथे सभा घेतली.
एक धरण फुटलं होतं, तेव्हा महाराष्ट्रातील एका मंत्र्यानं उत्तर दिलं की ते खेकड्यानं फोडलं होतं. मला तेव्हा दिल्लीतून काहींचे फोन आले, तुमच्या महाराष्ट्रात खेकड्यानं धरण फोडलं असं मत्रीमहोदय सांगत असल्याची विचारणा झाली. तेव्हा ते हसायला लागले, मी दम देऊन माझ्या महाराष्ट्राला हसायचं नाही, असं बजावलं. मी खेकडा खाते, आपण खेकड्याला खातो, तो कशाला आपल्याला खाईल. खेकडा कशाला धरण फोडेल, असे म्हणत तानाजी सावंत यांच्यावर टीका केली. तसेच, महाराष्ट्राला भिकेला लावेल, असं वक्तव्य सावंत यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्त्व्याचाही सुप्रिया यांनी समाचार घेतला. महाराष्ट्रात, देशात, जगात कुठेही... माझ्या महाराष्ट्राला भिकारी म्हणणारा माणूस मला चालणार नाही, असे म्हणत सावंत यांना लक्ष्य केलं. माझ्या महाराष्ट्राचा मला अभिमान आहे. माझ्या महाराष्ट्राला वाकडं नजरेनं जरी पाहिलं तर गाठ सुप्रिया सुळेंशी आहे. महाराष्ट्राला भिकारी म्हणाऱ्याला तुम्ही मतदारसंघातून हद्दपार करा, मी महाराष्ट्रातून हद्दपार करते, असा शब्द देते तुम्हाला असे म्हणत तानाजी सावंत यांना सुप्रिया सुळेंनी इशाराच दिला आहे.