३२व्या वर्षी प्रीती झाली १२० लेकरांची माय! बीडच्या गेवराईत उभारले ‘बालग्राम’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 06:06 AM2022-03-08T06:06:27+5:302022-03-08T06:06:45+5:30
- सोमनाथ खताळ लोकमत न्यूज नेटवर्क बीड : वय अवघं ३२ वर्षे तरीही १२० लेकरांची माय. आश्चर्य वाटलं ...
- सोमनाथ खताळ
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : वय अवघं ३२ वर्षे तरीही १२० लेकरांची माय. आश्चर्य वाटलं असेल ना! होय, हे खरं आहे. या लेकरांच्या मायचं नाव आहे प्रीती गर्जे स्त्री-भ्रूण हत्येने देशभर गाजलेल्या बीड जिल्ह्यातील गेवराई येथे ती सहारा अनाथालय चालविते. या अनाथालयात सध्या ७१ मुलगे आणि ४९ मुली आहेत. या सर्वांचा ती एक माय म्हणून सांभाळ करीत आहे.
स्त्री-भ्रूण हत्या,बालविवाहाने बदनाम झालेला आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा ही बीडची ओळख. याच जिल्ह्यात ही रणरागिणी जिद्दीने आणि पती संतोष गर्जेंच्या मदतीने १२० मुलांचा सांभाळ करीत आहे. गेवराईपासून तीन किमी अंतरावरील निसर्गरम्य वातावरणातील डोंगरकुशीत सहारा अनाथालय आहे. याला ‘बालग्राम’ असेही म्हणतात. संतोष गर्जे या तरुणाला आपल्या बहिणीच्या मृत्यूनंतर तिच्या मुलांचे झालेले हाल पाहावले नाहीत, म्हणून २००४ साली हा आश्रम उभारला. त्याच्या पंखांना लढण्याचे बळ दिले प्रीतीने.
प्रीती मूळची यवतमाळ येथील असून,ती वकील आहे. तिचे बाबा महावितरण महामंडळात सहायक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. लहान बहीण आणि भाऊ हेदेखील नामांकित कंपन्यांमध्ये काम करतात. घरातील परिस्थिती चांगली असतानाही तिने २०११ मध्ये संतोष गर्जे यांच्यासोबत नोंदणी पद्धतीने अवघ्या १०१ रुपयांत लग्न केले.
आईसह ६ नातवांची आजी
प्रीती १२० लेकरांची आई तर झालीच, शिवाय ५ मुले आणि १ मुलगी अशा सहा नातवांची आजी पण झाली. प्रीती व संतोष यांनी आतापर्यंत सहा मुलांचे विवाह लावून दिले आहेत.
मुलगी रेडिओलॉजिस्ट, मुलेही हुशार
याच आश्रमातील एक मुलगी रेडिओलॉजीचे शिक्षण घेत आहे. तसेच ब्युटीशियन,फाईन आर्ट,फायर इंजिनियर आदी क्षेत्रात मुली आहेत. मुलेही सीए,बीएस्सी आदी शिक्षण घेत आहेत. चार मुलगे चांगल्या पगारावर नोकरी करत आहेत.
महिन्याकाठी साडेपाच लाख रुपये खर्च
या मुलांचा सांभाळ करण्यासाठी महिन्याकाठी पाच ते साडे पाच लाख रुपये खर्च येत असल्याचे प्रीती सांगते. आर्थिक उत्पन्न काहीही नसले तरी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केलेली मदत आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून या मुलांची भूक भागविली जात आहे.