जास्त आवाज करू नका, माझ्याकडे आणखी २७ फोटो आणि ५ व्हिडिओ आहेत; राऊतांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 04:41 PM2023-11-20T16:41:56+5:302023-11-20T16:42:53+5:30
आमच्यात माणुसकी आहे म्हणून थोडी गमंत केली. २७ फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले तर भाजपाचे दुकान चालणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलं.
मुंबई - महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर असताना कॅसिनोत साडे तीन चार कोटी एका रात्रीत उधळले गेले.आम्ही मर्यादेचे उल्लंघन करत नाही.आम्ही वैयक्तिक हल्ला केला नाही. परंतु सुरुवात तुम्ही केलीय आणि अंत आम्ही करू. जानेवारीपर्यंत तुम्हाला कळेल. तुम्ही जास्त आवाज करू नका. आमच्याशी वाद घालू नका. तुम्ही जास्त आवाज केला तर माझ्याकडे २७ फोटो आणि ५ व्हिडिओ आहेत. तुम्हाला तुमचे दुकान बंद करावे लागेल अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना इशारा दिला आहे.
संजय राऊत म्हणाले की, १ रात्रीत साडे तीन कोटी कॅसिनोत उधळले गेले. नाना पटोलेंनी केलेली चौकशीची मागणी योग्य आहे. आम्ही जो फोटो टाकलाय तो फोटो त्यांचा नाही असं सांगावं. तेलगीनं एका बारमध्ये १ कोटी उधळले होते. पण मक्काऊमध्ये महाराष्ट्रातील माणूस कोट्यवधी उधळतो ही चांगली वेळ आलीय. रात्री १२ वाजता रेस्टॉरंटला जातात.साडे तीन कोटींचे कॉईन्स विकत घेतात. त्यानंतर आरामात बसतात. मी कोणाच्या व्यक्तिगत आनंदावर विरजन घालू इच्छित नाही. महाराष्ट्रातील परिस्थिती काय, सामाजिक वातावरण काय हे माहिती असताना नुसते आरोप प्रत्यारोप चालणार नाही. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. तुम्ही जेवढे खोटे बोलाल तेवढे फसाल. माझ्याकडे २७ फोटो आणि ५ व्हिडिओ आहेत. आमच्यात माणुसकी आहे म्हणून थोडी गमंत केली. २७ फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले तर भाजपाचे दुकान चालणार नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच माझ्यावर कुणीही टीका केली तरी मी व्यक्तिगत टीका करत नाही. सुरुवात कोणी केली हे त्यांना कळायला हवं. आम्हीही हात घालू शकतो. तुमच्याकडे महाराष्ट्रात ईडी, सीबीआय असेल पण आमच्याकडे मक्काऊमध्ये ईडी,सीबीआय आहे. साडे तीन कोटी रुपये डॉलर्समध्ये दिलेत. नाना पटोले अत्यंत योग्य बोलतायेत. उगाच टोलझाड सोडलीय ती बंद करा अन्यथा दुकान बंद करावे लागेल. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. आम्ही सगळे पोलादी भट्टीतून अन्याय सहन करून बाहेर पडलेली माणसं आहोत. दिवाळीत साडे तीन कोटी खर्च केले. आनंद मिळतोय तर घ्यावा पण महाराष्ट्रातील परिस्थिती काय, शेतकरी आत्महत्या करतायेत. तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात तुम्हाला कळायला हवे असा टोला संजय राऊतांनी लगावला.
दरम्यान, आदित्य ठाकरे फुटबॉलपटूला भेटले ते वाईट आहे का? मोदी जे परदेशात जाऊन पितात,तोच ब्रॅन्ड आदित्य ठाकरे पितात. तुम्हाला हवा असेल तर घेऊन जा. मक्काऊमधला जगातील सर्वात मोठा कॅसिनो आहे. महाराष्ट्रातील एक व्यक्ती आहे, एका रात्रीत साडे तीन कोटी खर्च केलेत असं मला एका सांगितले. मी फोटो टाकला नाव घेतले नव्हते. परंतु भाजपाने सांगितला हा आमचा माणूस आहे. कुटुंबासह बाहेर फिरायला गेले होते. यात लपवण्यासारखे काय आहे. आरोप केलेत म्हणून प्रतिआरोप करू नका. उत्तरे द्या असं आव्हान राऊतांनी भाजपाला दिले आहे.