“माझ्याकडे राष्ट्रीय पक्षांची यादी, कोणाचा हात सांगण्याची गरज नाही,” एकनाथ शिंदेंच्या व्हिडीओनंतर पवारांची रोखठोक प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 08:16 PM2022-06-23T20:16:16+5:302022-06-23T20:16:37+5:30
एकनाथ शिंदे हे त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांशी संवाद साधतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता.
एकनाथ शिंदे हे त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांशी संवाद साधतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता. नॅशनल पार्टी, महाशक्ती. त्यांनी मला सांगितलंय, तुम्ही जो हा निर्णय घेतला आहे, हा देशातला ऐतिहासिक निर्णय आहे. तुमच्यामागे आमची पूर्ण शक्ती आहे. कुठेही काही लागलं तर कधीही कमी पडणार नाही, याची प्रचिती आपल्याला जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा येईल असं सांगत एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपचा पाठिंबा असल्याचं सूतोवाच केलं होतं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.
आसाममध्ये व्यवस्था करणं म्हणजे तेथील राज्य सरकार अॅक्टिव्ह आहे. राज्य भाजपच्या हाती आहे. वस्तूस्थिती काय आहे हे स्पष्ट होतंय. तिथे कोण आहे, नाही नावं घेण्याची गरज नाही. तिथे जे दिसतंय ते कोण आहेत हे तुम्हाला समजेल, असंही ते म्हणाले. आता मी एकनाथ शिंदेंचा व्हिडीओ पाहिला. आम्हाला एका राष्ट्रीय पक्षाचा पाठींबा असल्याचं ते म्हणाले. माझ्याकडे यादी आहे, त्यात राष्ट्रीय पक्ष कोण भाजप, बसपा, कम्युनिस्ट पार्टी सीपीआय, सीपीएम, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केलेली यादी आहे. यात बसपा, कम्युनिस्ट पार्टी सीपीआय, सीपीएम, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा हात आहे का? आणि नसेल तर कोणाचा हात आहे हे सांगण्याची गरज नसल्याचंही ते म्हणाले.
“महाविकास आघाडीचा प्रयोग फसला असं नाही. अडीच वर्षे महाविकास आघाडीनं उत्तम काम केलं आहे. अनेक महत्त्वाचे निर्णयही घेतले. कोरोना काळातही उत्तम काम झालं आहे अशात प्रयोग फसला असं म्हटलं जातं हे राजकीय अज्ञान आहे,” असंही त्यांनी सांगितलं. सरकार अल्पमतात आहे का नाही, हे ठरवण्याचा अधिकार हा विधानसभेला आहे. विधानसभेत हे सरकार बहुमतात आहे का नाही, हे स्पष्ट होईल, असंही पवार म्हणाले.
... तर परिणाम भोगावे लागतील
शिवसेनेचे आमदार कुठेही गेले तरी त्यांना राज्यात यावेच लागेल. विधानसभेच्या प्रांगणात आल्यानंतर मला वाटत नाही की त्यांना आसाम आणि गुजरातचे नेते इथे येऊन मार्गदर्शन करतील. तसेच तिथे गेलेल्या आमदारांनी घेतलेला निकाल पक्षांतर बंदी कायद्याच्या विरोधात आहे, त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्याशिवाय त्यांच्या मतदारसंघात देखील त्याची प्रतिक्रिया उमटेल, त्यामुळेच आपल्या मतदारसंघातील लोकांना काहीतरी सांगावे, यासाठी निधी मिळत नसल्याची कारणे पुढे केली जात आहेत, असंही शरद पवार यांनी सांगितलं.