आईला विमानात बसविण्यासाठी मुलीनं लढवली हटके शक्कल
By admin | Published: June 24, 2017 01:50 AM2017-06-24T01:50:56+5:302017-06-24T04:52:34+5:30
वृद्ध आईला विमानात सुखरूप बसविण्यासाठी ४२ वर्षांच्या मुलीने अनोखी शक्कल लढविल्याचा प्रकार आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाहावयास मिळाला
गौरी टेंबकर-कलगुटकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वृद्ध आईला विमानात सुखरूप बसविण्यासाठी ४२ वर्षांच्या मुलीने अनोखी शक्कल लढविल्याचा प्रकार आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाहावयास मिळाला. चक्क कॅन्सल केलेल्या तिकिटाची प्रत घेऊन तिने विमानतळावर प्रवेश करत तेथील यंत्रणेला चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र ती बाहेर पडताना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ)च्या अधिकाऱ्यांनी तिला हटकले आणि हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सहार पोलिसांनी नंदा नायडूला अटक केली आहे.
मूळची भारतीय नागरिक असलेली नायडू गेल्या २५ वर्षांपासून पती आणि दोन मुलांसोबत कुवैतला राहते. कुवैतमध्ये ती एका ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये काम करते. तिचे आई-वडील नवी मुंबईमध्ये राहतात. ७५ वर्षीय आई काही दिवस कुवैतला नंदासोबत राहण्यासाठी आली होती. काही दिवसांनी आईला पुन्हा कुवैतला पाठवायचे होते. मात्र आई विमानापर्यंत एकटी पोहोचेल की नाही? विमानात जायचे म्हणजे अतिरिक्त खर्चही वाढणार होता. अशा वेळी आईला सुखरूप पोहोचवून अतिरिक्त तिकिटाचा खर्च टाळण्यासाठी तिने ही अनोखी शक्कल लढविली.
नंदाने २१ जूनची दोघींची कुवेत एअरलाइन्सची ‘मुंबई-दुबई’ तिकिटे बुक केली. याची प्रत स्वत:कडे घेतली. त्यानंतर स्वत:ची ‘आॅनलाइन’ तिकीट मात्र तिने रद्द केली. मात्र स्वत:कडे बुकिंग केलेल्या तिकिटाची प्रत तिने ठेवत आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवेश केला. आपल्या आईला तिने कुवैत एअरलाइन्समध्ये बसविले आणि विमानतळावरून पुन्हा मागे निघाली असता सीआयएसएफच्या जवानांनी तिला हटकले.
‘तू विमानतळावरून परत का आलीस’, असे त्यांनी तिला विचारले. तेव्हा या प्रवाशांच्या यादीत माझे नाव नाही, म्हणून मी परतले असे उत्तर तिने दिले. त्यावर संशय आल्याने सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी संबंधित एअरलाइन्सकडे विचारणा केली. तेव्हा नंदाकडे असलेले तिकीट रद्द असल्याची माहिती समोर आली.