मला जेलमध्ये घालणारा जन्मलेला नाही

By admin | Published: May 14, 2015 01:19 AM2015-05-14T01:19:02+5:302015-05-14T01:19:33+5:30

मुश्रीफ यांचा शेट्टींवर पलटवार : सत्तेसाठी माझा जन्म झालेला असावा

I have not been born in jail | मला जेलमध्ये घालणारा जन्मलेला नाही

मला जेलमध्ये घालणारा जन्मलेला नाही

Next

कोल्हापूर : सत्तेसाठी माझा जन्म झाला असावा. आयुष्यामध्ये कोणतेही चुकीचे काम केले नाही. त्यामुळे मला जेलमध्ये घालणारा अद्याप जन्मलेला नाही, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रपरिषद घेवून खासदार शेट्टी यांच्यावर टीका केली होती. त्यास शेट्टी यांनी मंगळवारी प्रत्युत्तर दिले. त्यावर पुन्हा बुधवारी मुश्रीफ यांनी निवेदनाद्वारे उत्तर दिले. ते म्हणतात,‘शासनाच्या पुढाकाराने पुण्यात साखर परिषद झाली. खा. शेट्टी यांना निमंत्रण नव्हते म्हणून ते रागावले व त्यांनी ३ मे रोजी सांगलीत प्रतिसाखर परिषद घेऊन भाजप शासनावर तोंडसुख घेतले. भाजप पक्षाची मस्ती उतरवू, म्हणत सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर त्यांनी प्रचंड टीका केली. पालकमंत्र्यांना घेराव घालू व एफआरपी देण्यासाठी शासनास भाग पाडू, अशी वक्तव्ये केली. परंतू लगेच चार दिवसांत मंत्रिपदासाठी व महामंडळाच्या चार तुकड्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानावर लोटांगण घातले असे वक्तव्य मी केल. खा. शेट्टी यांना सरकारच्या विरोधात वक्तव्य करा, असे आम्ही सांगितले नव्हते. त्याची शाई वाळण्याच्या आत मुख्यमंत्र्यांच्या चरणस्पर्शासाठी आपण जाता, शेतकरी हे पाहत आहे. त्या चर्चेमध्ये आपण ‘एफआरपी’साठी कोणतेही चर्चा करीत नाही, याची फक्त मी आठवण करून दिली.
जिल्हा बॅँकेमधील थकबाकीदार संस्थांची मालमत्ता असताना तेथील संस्थेचे संचालक जबाबदार असताना, थेट बॅँकेच्या संचालकांवर जबाबदारी निश्चित करणे योग्य होणार नाही; म्हणून उच्च न्यायालयानेच या कारवाईस स्थगिती दिली व शासनावर ताशेरे झाडले. उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत शेट्टी यांना पाठवीत आहे. कागल शाखेतील अपहारावेळी मी स्वत:च ‘सीआयडी’ची चौकशी लावली. न्यायालयामध्ये हे प्रकरण प्रलंबित आहे. खा. शेट्टी यांची नार्को टेस्टची मागणी यापूर्वीच मी स्वीकारलेली आहे. कर नाही त्याला डर कशाची..? शिळ्या कढीला ऊत आणून ती आटून गेली आहे.
खा. शेट्टी यांनी ऊस उत्पादकांचा विश्वासघात केला आहे. त्यांची विश्वासार्हता धोक्यामध्ये आल्यामुळे ते माझ्यावर आगपाखड करीत आहेत. गोरगरीब जनतेची सेवा करूनच मोठे होता येते व मिळालेला सत्तेचा वापर सर्वसामान्यांसाठी करावयाचा असतो, हे तत्त्व मी आयुष्यभर जपले. पंधरा वर्षे मंत्रिपदावर राहण्याची संधी मिळाली. या काळात मला कोणताही डाग लागलेला नाही; उलट मंत्री कसा असावा याचा आदर्श घालून देण्याचा मी प्रयत्न केला असाही दावा मुश्रीफ यांनी केला आहे. (प्रतिनिधी)


अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार
आयुष्यामध्ये जागा हडपणे, आरक्षण उठविणे हा धंदा मी केलेला नाही. बॅँकेमध्ये संस्था अडचणीमध्ये आणून लिलाव काढणे किंवा महानगरपालिकेमध्ये मोक्याचा जागा हडप करण्यासाठी महापौरांचा राजीनामा मागणी असा जो आरोप शेट्टी यांनी केला आहे, याबद्दल योग्य त्या न्यायालयामध्ये मी अब्रूनुकसानीचा दावा ठोकू. बॅँकेच्या कारभारासाठी व महानगरपालिकेतील प्रकरणासाठी शासनाने चौकशी समिती नियुक्त करावी व खा. शेट्टींना तिचे अध्यक्ष करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे.


‘शेट्टी को गुस्सा क्यों आता है?
ज्यावेळी एखादी गोष्ट खरी असते ती सार्वजनिक झाली की वाईट वाटते, त्याचे दु:ख मी समजू शकतो; परंतु खा. शेट्टींना सत्ता हवी आहे हे लपून राहिलेले नाही. त्यासाठी लोटांगणाचा ते प्रयोग करीत आहेत, याची जाणीव शेतकऱ्यांना झाली आहे. खासदार शेट्टी को गुस्सा क्यों आता है...? अशी विचारणा मुश्रीफ यांनी केली आहे.

Web Title: I have not been born in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.