उद्यापासून राज्यभर ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ अभियान - अशोक चव्हाण
By admin | Published: July 11, 2017 08:48 PM2017-07-11T20:48:49+5:302017-07-11T20:48:49+5:30
राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. खोटे आकडे देऊन सरकारने राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. सरकारचा खोटेपणा उघड करण्यासाठी
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई दि. 11 - राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. खोटे आकडे देऊन सरकारने राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. सरकारचा खोटेपणा उघड करण्यासाठी आणि सरसकट सर्व शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेसतर्फे उद्यापासून ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ हे राज्यस्तरीय अभियान राबवणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.
विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली सरकारने घातलेल्या जाचक अटी व शर्तींमुळे बहुतांशी शेतक-यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. ज्या शेतक-यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही आणि ज्यांचा सातबारा कोरा झाला नाही अशा सर्व शेतक-यांच्या सह्या घेऊन सरकारला निवेदन देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्यावी ही काँग्रेस पक्षाची मागणी कायम असून 30 जून 2017 पर्यंत थकीत असलेल्या सर्व शेतक-यांचे कर्ज माफ करावे तसेच कर्जाचे पुनर्गठण झालेल्या सर्व शेतक-यांचे कर्ज माफ होईपर्यंत काँग्रेस पक्षाचा लढा सुरुच राहील असे खासदार अशोक चव्हाण म्हणाले.
या बैठकीत जीएसटी कायद्याबाबत चर्चा झाली. जीएसटीबाबत जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. हे काँग्रेस सरकारचे जीएसटी विधेयक या विधेयकातील अटींमुळे व्यवसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. जीएसटीमुळे भिवंडी, इचलकरंजी येथील कपडा उद्योग ठप्प झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम हे राज्यभरात विविध ठिकाणी सभा आणि चर्चासत्रांमधून जीएसटीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. पुण्यातून याची सुरुवात होईल असे खासदार अशोक चव्हाण म्हणाले.
या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नसीम खान, बस्वराज पाटील,खा. हुसेन दलवाई विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस, आ. भाई जगताप, अमर काळे यांच्यासह नेते उपस्थित होते.