मी कोणतीही चूक केली नाही, पवार साहेबांचे आशिर्वाद पाठिशी - छगन भुजबळ
By Admin | Published: February 9, 2016 03:07 PM2016-02-09T15:07:04+5:302016-02-09T15:19:37+5:30
मी कोणतीही चूक केली नसून कोणत्याही कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास तयार असून पराव साहेबांचे आशिर्वाद माझ्या पाठिशी आहे, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - बेहिशेबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे अखेर आज दुपारी अमेरिकेतून मुंबई विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी विमानतळावर मोठ्या प्रमाणात हजेरी लाऊन घोषणाबाजी करत शक्तीप्रदर्शन केले. यावेळी भुजबळ यांनी सर्व कार्यकर्त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानत त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले
' आपण कोणतीही चूक केलेली नसून कोणत्याही कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगत शरद पवारांचा आशिर्वाद आपल्या पाठिशी असल्याचे ' भुजबळ यांनी नमूद केले.
गेल्या आठवड्यात भुजबळ यांच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाकडून छापे मारण्यात आले होते. एक डझनपेक्षा जास्त अधिका-यांनी छगन भुजबळ तसेच पंकज व समीर भुजबळ यांच्या विविध ठिकाणच्या नऊ मालमत्तांवर छापे मारले.
छगन भुजबळ लवकरच तुम्हाला तुरुंगात दिसतील अशी प्रतिक्रिया भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी या छाप्यांवर दिली आहे. छगन भुजबळ तसेच पंकज व समीर भुजबळ यांच्या विविध ठिकाणच्या नऊ मालमत्तांवर छापे मारण्यात आले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भुजबळ यांच्या मालकीचा बांद्रे येथील एक मोकळा भूखंड व सांताक्रूझ येथील एक नऊ मजली इमारत या दोन्ही मालमत्तांवर टाच आणली होती.
तर याचप्रकरणी भुजबळ यांचा पुतण्या माजी खासदार समीर भुजबळ यांना इडीने गेल्या आठवड्यात अटक करून त्यांचा पासपोर्टही जप्त केला.