तुम्ही राजीनामा दिलात का?... राधाकृष्ण विखेंची सूचक प्रतिक्रिया, सस्पेन्स वाढवला!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 12:32 PM2019-03-13T12:32:45+5:302019-03-13T12:34:12+5:30
सुजय विखे पाटील यांचा भाजपाप्रवेश हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसाठी धक्का आहेच, पण राधाकृष्ण विखेंचंही हे मोठं अपयश मानलं जातंय.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसाठी हा धक्का आहेच, पण राधाकृष्ण विखेंचंही हे मोठं अपयश मानलं जातंय. या पार्श्वभूमीवर, ते विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या संदर्भात सावध आणि सूचक प्रतिक्रिया देत, राधाकृष्ण विखेंनी सस्पेन्स वाढवला आहे.
मी अद्याप विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेला नाही. माझ्या राजीनाम्याची माध्यमांनाच घाई झालीय. मी पुढच्या दोन दिवसांत माझी भूमिका स्पष्ट करेन, असं राधाकृष्ण विखेंनी सांगितलं.
सुजय विखे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा अनेक दिवस सुरू होती. काल हा अंदाज खरा ठरला. विखे-पाटील घराण्याची बंडाची परंपरा कायम राखत डॉ. सुजय विखे पाटील भाजपावासी झाले. विरोधी पक्षनेत्याच्या घरातच आम्ही 'कमळ' फुलवलं, असा संदेश भाजपाने या निमित्ताने दिला आहे. सुजय यांच्या या निर्णयामागे अनेक कारणं असली, तरी आपल्या मुलालाच पक्षात थांबवू न शकल्याचा ठपका राधाकृष्ण विखेंवर ठेवला जातोय. त्यामुळे ते काय भूमिका घेणार, आपल्या मुलाच्या विरोधात प्रचार करणार का, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.
सुजय विखेंचं खासदारकीचं तिकीट मुख्यमंत्र्यांकडून 'कन्फर्म', नगरच्या विजयाबद्दल 'फर्म' https://t.co/M6iXttvej4
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 12, 2019
काय आहे विखे-पवार-काँग्रेस संघर्ष?https://t.co/rzhs00TKvk@BJP4India@INCIndia@NCPspeaks
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 12, 2019
अर्थात, विखे घराण्याचे काँग्रेसमधील हे पहिलेच बंड नाही. सुजय यांचे आजोबा दिवंगत बाळासाहेब विखे हे ३५ वर्षं खासदार होते. या काळात त्यांनी वेळोवेळी काँग्रेसशी पक्षात राहूनच संघर्ष केला होता. विखे हे पवार विरोधक म्हणूनही पुढे आले होते. या जुन्या नातेसंबंधांमुळेच बहुधा राष्ट्रवादीने सुजय विखेंच्या उमेदवारीला विरोध केला आणि त्यांना वेगळा मार्ग स्वीकारावा लागला.
पवारांच्या भूमिकेमुळे सुजय विखे भाजपात गेलेhttps://t.co/Oij5BOTDf9
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 13, 2019