मीही भोगला १६ वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 03:10 AM2018-03-11T03:10:58+5:302018-03-11T03:10:58+5:30
१२ मार्च १९९३ ला मुंबई बॉम्बस्फोटाची बातमी टीव्हीवर पाहिली आणि माझे मन सुन्न झाले. त्या वेळी मी जळगावला वकिली करत होतो. हे स्फोट कोणी केले, का केले, हे प्रश्न सामान्यांप्रमाणे माझ्याही मनात घोळू लागले. दोन-तीन दिवसांनी बातमी आली की, या साखळी बॉम्बस्फोटामागे टायगर मेमनचा हात आहे. मे-जूनमध्ये जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक दीपक जोग मला संध्याकाळी निवासस्थानी येऊन भेटले. त्यांनी संध्याकाळच्या वेळी माझ्या निवासस्थानी येणे, याचे मला थोडे आश्चर्य वाटले.
- अॅड. उज्ज्वल निकम
१२ मार्च १९९३ ला मुंबई बॉम्बस्फोटाची बातमी टीव्हीवर पाहिली आणि माझे मन सुन्न झाले. त्या वेळी मी जळगावला वकिली करत होतो. हे स्फोट कोणी केले, का केले, हे प्रश्न सामान्यांप्रमाणे माझ्याही मनात घोळू लागले. दोन-तीन दिवसांनी बातमी आली की, या साखळी बॉम्बस्फोटामागे टायगर मेमनचा हात आहे. मे-जूनमध्ये जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक दीपक जोग मला संध्याकाळी निवासस्थानी येऊन भेटले. त्यांनी संध्याकाळच्या वेळी माझ्या निवासस्थानी येणे, याचे मला थोडे आश्चर्य वाटले. आमची थोडी चर्चा झाल्यावर त्यांनी लगेच मुद्द्याला हात घातला. मुंबई साखळी बॉम्बस्फोटाच्या खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहणार का, असा प्रश्न त्यांनी करताच मला धक्का बसला. तत्कालीन मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस सहआयुक्त एम.एन. सिंग यांचा तसा फोन आल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर मी त्यांना खटल्याची कागदपत्रे पाहिल्याशिवाय उत्तर देऊ शकणार नाही, असे स्पष्ट सांगितले. ठीक आहे, मग उद्या निघा, असे त्यांनी सांगताच मी मुंबईला येण्याची तयारी दर्शविली. घरचे तसे नाराज होते. बॉम्बस्फोट होतात, तिथे जाऊ नका, असे ते म्हणत होते.
दुस-या दिवशी मी मुंबईला पोहोचलो. सीएसटीला उतरल्यावर तिथे मला घ्यायला आलेल्या पोलिसांनी थेट पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात नेले. तत्कालीन पोलीस आयुक्त अमरजीत सामरा, एम. एन. सिंग, राकेश मारिया यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी तेथे उपस्थित होते. सर्व पोलीस माझ्याकडे ज्या नजरेने पाहत होते , त्यावरून ते माझ्याबाबत काय विचार करत होते, हे मी सहज ताडू शकलो. ग्रामीण भागातून आलेला हा वकील मुंबईच्या वकिलांना टक्कर देऊ शकतो का, असा प्रश्न त्यांना पडला होता. सिंग यांच्याशी चर्चा केल्यानंतर माझा पहिला प्रश्न त्यांना होता की, या गुन्ह्यात टायगर मेमनचा हात आहे, हे तुम्ही कशावरून सांगता? यावर अधिकाºयांनी मेमनविरोधातील पुराव्यांचा पाढाच वाचला.
आरोपींच्या ओळख परेडबाबत विचारणा केल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यातच ओळख परेड घेतल्याचे मला सांगितले. मला त्यांच्या या उत्तरावर धक्का बसला. स्कॉटलँड यार्ड पोलिसांच्या तोडीचे असलेले मुंबईचे पोलीस ही चूक कशी करू शकतात, हा प्रश्न मलाच पडला. भविष्यात या चुकीचा फायदा आरोपी घेऊ शकतात आणि केस कमजोर होऊ शकते, याची कल्पना मी वरिष्ठ पोलिसांना दिली. पण मी ग्रामीण भागातील असल्याने त्यांना ते पटले नाही. तिथे उपस्थित असलेल्या वरिष्ठ पोलिसांनी आणि सरकारी वकिलांनी एकसुरात सांगितले की, मुंबईत अशीच प्रॅक्टिस चालते. मग मी त्यांना प्रतिप्रश्न केला की, मुंबईसाठी सीआरपीसी आणि एव्हिडन्स अॅक्ट वेगळे आहेत का? माझ्या या प्रश्नानंतर त्यांना मी कसा आहे आणि कोण आहे, याची कल्पना आली. त्यानंतर मी आरोपींची ओळख परेड ते न्यायालयीन कोठडीत असताना करणे कायद्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहे, हे त्यांना पटवून दिले. त्यांनतर त्यांनी माझ्या मताशी सहमती दर्शविली.
कालांतराने माझी आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट झाली. माझी त्यांच्याशी ओळख करून देण्यात आल्यानंतर त्यांनी सामरा आणि सिंग यांना अँटीचेंबरमध्ये नेले. तेथे त्यांची १० ते १२ मिनिटे बैठक झाली. आम्ही परत जाताना मी सिंग यांना विचारले की, पवार साहेबांच्या मनात माझ्याविषयी शंका दिसते. कदाचित पवार साहेबांना भीती वाटत असेल की, मुंबईच्या वकिलांसमोर मी टिकू शकेन का? यावर सिंग हसून म्हणाले की, ‘पवार यांना असे वाटणे साहजिकच आहे. आम्ही जरी तुमची शिफारस केली असली तरी या केसमध्ये काही विपरीत घडले तर राज्याचे प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे.’ मला याचे वाईट वाटले नाही. त्यानंतर वरिष्ठ अधिकाºयांबरोबर अनेक बैठका झाल्या. यादरम्यान आमच्यात चांगले सूत जुळले. मी खटला चालविण्याची तयारी दर्शविली आणि काही काळात खटला सुरू झाला.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी या गुन्ह्याप्रकरणी संबंधित आरोपींवर ठेवलेला देशाविरूद्ध युद्ध छेडल्याचा आरोप सीबीआयने दोषारोपपत्रातून वगळला. मात्र, त्या वेळी आम्ही हा आरोप कायम ठेवण्याचा सल्ला सीबीआयला दिला होता. परंतु, हे आरोपी या देशाचेच नागरिक असल्याने त्यांच्यावर देशाशी युद्ध छेडल्याचा आरोप ठेवला जाऊ शकत नाही, या मतावर सीबीआय ठाम होते. माझे वैयक्तिक मत काहीही असले तरी सीबीआय तपास यंत्रणा असल्याने त्यांचे म्हणणे मान्य करणे भाग होते. सीबीआयच्या या निर्णयामुळे मला त्या वेळी मनस्वी दु:ख झाले. सीबीआयने या आरोपींवर देशाविरुद्ध युद्ध छेडल्याचा गुन्हा नोंदवला असता, तर त्याचवेळी १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटामागे पाकिस्तानचीच फूस होती, हे तेव्हाच सिद्ध करू शकलो असतो. पाकिस्तानचा खरा चेहरा संपूर्ण जगासमोर आला असता. पण प्राप्त परिस्थितीत काही निर्णय होतात आणि त्यावर टीका करणे योग्य नाही. परंतु, या गोष्टीची सल माझ्या मनात राहिली होती. पुढे २६/११ च्या खटल्यात मी हे शल्य दूर केले. मुंबईवरील दहशतवादी हल्ला कसा पाकिस्तान पुरस्कृत होता, हे न्यायालयात सिद्ध करू शकलो आणि न्यायालयानेही निकालात हे मान्य केले. अखेरीस पाकिस्तानचे कारस्थान संपूर्ण जगासमोर आणण्यात यशस्वी झालो.
या खटल्यादरम्यान मी आरोपींसह १४ वर्षे आॅर्थर रोड तुरुंगात सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत काढली आहेत. त्यानंतर कसाबच्या खटल्यात आणखी दोन वर्षे. अशा प्रकारे मी आयुष्यातील १६ वर्षे आॅर्थर रोड कारागृहात काढली आहेत. या खटल्यामुळे माझे नाव सर्वत्र दुमदुमू लागले. मला आजही आठवतो १९९३ च्या खटल्याचा निकालाचा दिवस... निकाल लागल्यानंतर मी आॅर्थर रोड तुरुंगातून हॉटेलमध्ये चाललो होतो. रस्त्यावर लोकांनी माझी गाडी अडवून मला हार घातले. त्यानंतर हॉटेलच्या गल्लीत ढोल-ताशे वाजवून माझी मिरवणूक काढण्यात आली. सामान्य माणसाच्या चेहºयावरील आनंद, हाच माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा ठेवा.
या खटल्यानंतर अनेक महत्त्वाचे खटले लढविण्यासाठी माझ्या नावाची मागणी होऊ लागली. त्यानंतर सरकारलाही माझ्यावरील प्रेमाची जाणीव झाली. कोणत्याही राजकीय पक्षाचे सरकार असो, माझा कधीच पक्षाशी संबंध नसतो. त्यामुळे सरकारने जनक्षोभ शांत करण्यासाठी माझ्या नावाचा ‘अँटी-बायोटिक’ म्हणून वापर केल्याने अनेकांचा जळफळाट झाला. त्यास माझा नाईलाज आहे.
(शब्दांकन : दीप्ती देशमुख )