"माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद, हे माझा काय मुकाबला करणार", अब्दुल सत्तारांचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 04:35 PM2024-11-13T16:35:49+5:302024-11-13T16:38:33+5:30
"महाराष्ट्रात मोजून चार पाच नेते आहे, त्यात माझे नाव आहे."
सिल्लोड : आपल्या वक्तव्याने नेहमी चर्चेत राहणारे सिल्लोडचे शिंदेगटाचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. "माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद आहे, तर हे चणे चरपटे माझा काय मुकाबला करणार', असे वादग्रस्त वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केले आहे. सत्तार आणि भाजप नेते रावसाहेब दानवेंचे वैर सर्वश्रृत आहे. त्यामुळे सत्तारांचे वक्तव्य दानवेंविरोधात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
अजिंठ्यातील सभेत बोलताना सत्तार म्हणतात, ''विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळेच ते खालच्या पातळीवर जाऊन जातीपातीवर मते मागत आहेत. महाराष्ट्रात मोजून चार पाच नेते आहे, त्यात माझे नाव आहे. माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद आहे, हे किड्या-मुंग्यांसारखे लोक माझे काय करणार. त्यामुळेच काही लोक माझ्यावर जळतात. मी गेल्या 25 वर्षांमध्ये कोट्यावधी रुपयांची काम केली आहेत. जो विकास कामे करतोय, त्याला मतदान करा'', असे आवाहन सत्तारांनी केले.
यावेळी सत्तारांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यावरही सडकून टीका केली. ते म्हणाले, ''आजवर माझे चॉकलेट व बिर्याणी दानवे यांना गोड लागत होती. आता जनतेने त्यांना जागा दाखवली, त्यामुळे झोपेतही त्यांना मीच दिसतो. दानवे निवडून येत होते, तेव्हा सिल्लोड हा पाकिस्तान नव्हता. आता पराभूत झाल्यावर त्यांना सिल्लोड म्हणजे पाकिस्तान वाटतो'', असा टोलाही त्यांनी लगावला.