ED at Sanjay Raut Residence: 'मी सावध केलेले पण ऐकतील ते संजय राऊत कुठले'; रामदास कदमांनी घेतले अनिल परबांचेही नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 10:44 AM2022-07-31T10:44:26+5:302022-07-31T10:45:21+5:30
ED at Sanjay Raut Residence: पत्रा चाळ प्रकरणी राऊत यांना गेल्या काही काळापासून ईडी समन्स बजावत होती. यावर राऊत वेगवेगळी कारणे देत चौकशी टाळत होते.
वसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी सकाळी सकाळीच ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. संजय राऊत आणि त्यांची पत्नी यांची चौकशी सुरु आहे. शिवसैनिक जमू लागल्याने पोलिसांचा आणखी फौजफाटा मागविण्यात आला आहे. राऊत यांना ईडी आज ताब्यात घेण्याची शक्यता आहे. त्यांना ईडीच्या कार्यालयात नेले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
Sanjay Raut ED Action: संजय राऊतांना कोणत्याही क्षणी ईडी ताब्यात घेणार; पोलिसांचा मोठा फौजफाटा, शिवसैनिक जमण्यास सुरुवात
यातच शिवसेनेचे शिंदे गटात गेलेले नेते, माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत हे राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्यास यशस्वी ठरले. उद्धव ठाकरेंना मी दोष देणार नाही, परंतू त्यांचे मन राऊतांनी वळविले. रोज सकाळी ते रात्री झोपेपर्यंत राऊत टीका करत सुटायचे. महाविकास आघाडीचे एजंट सारखे वागत होते. राऊत माझे चांगले मित्र आहेत, त्यांना मी सांगितलेले हे थांबवा, परंतू ऐकतील ते संजय राऊत कुठले, असे रामदास कदम यांनी म्हटले.
माझा मुलगा योगेश कदम याला राजकीयदृष्ट्या संपविण्यासाठी अनिल परब यांनी काम केले. आमची नगरपालिका राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचे काम त्यांनी केले. शिवसेना कोणी संपविली? याच लोकांनी असा आरोप कदम यांनी केला. राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला अजित पवार १० कोटी रुपये देतात. उद्धव ठाकरेंना बरे नव्हते, त्यामुळे ते मंत्रालयात जात नव्हते. यामुळे पवारांना आंदनच मिळाले असा आरोप कदम यांनी केला.
संजय राऊत हे खचणारे नाहीत. ते ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील. ते कोणत्याही प्रश्नाची उत्तरे द्यायचे, आपण पाहिले. यामुळे ते ईडीच्या चौकशीला सामोरे जातील असेही कदम म्हणाले.
पत्रा चाळ प्रकरणी राऊत यांना गेल्या काही काळापासून ईडी समन्स बजावत होती. यावर राऊत वेगवेगळी कारणे देत चौकशी टाळत होते. यापूर्वी २० जुलैला नंतर २७ जुलैला ईडीने समन्य बजावले होते. परंतू राऊत यांनी लोकसभा अधिवेशन सुरु असल्याने उपस्थित राहू शकत नाही, असे ईडीला कळविले होते. शनिवारी राऊत मुंबईत आले आणि ईडीने रविवारी सकाळीच राऊतांच्या घरी हजेरी लावली.