आलो गायक होण्यासाठी पण झालो मात्र संगीतकार...!
By admin | Published: February 6, 2017 04:35 AM2017-02-06T04:35:51+5:302017-02-06T04:35:51+5:30
अलिबागच्या छोट्याशा गावातून मी मुंबईला गायक होण्यासाठी निघालो खरा, पण माझी भेट विश्वनाथ मोरे या प्रतिभावंत संगीतकाराशी झाली.
मुरलीधर भवार, पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली)
अलिबागच्या छोट्याशा गावातून मी मुंबईला गायक होण्यासाठी निघालो खरा, पण माझी भेट विश्वनाथ मोरे या प्रतिभावंत संगीतकाराशी झाली. त्यांचा आवाज बसल्याने त्यांनी मला आशा भोसले यांना चाल सांगण्यास सांगितले. गाणे होते ‘तालासुरांची गट्टी जमली, नाच गाण्यात मैफल जमली’, चाल सुंदर झाल्याची दाद स्वत: आशाबार्इंनी दिली. गायक व्हायला आलो होतो, पण संगीतकार झालो. तेव्हापासून आजपर्यंत तालासुरांची गट्टी जमलेलीच आहे, असा किस्सा सांगून संगीत क्षेत्रात पदार्पण कसे झाले, याचा प्रवास ज्येष्ठ संगीतकार अच्युत ठाकूर यांनी उलगडला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील शं.ना. नवरे सभामंडपातील ‘आगरी कलादर्शन’ या कार्यक्रमात संगीतकार ठाकूर यांची मुलाखत शनिवारी रात्री ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी घेतली. या कार्यक्रमात ठाकूर यांची मुलाखत घेण्याचे प्रयोजन स्पष्ट करताना कवी म्हात्रे म्हणाले की, ठाकूर हे आगरी आहेत. मी देखील आगरी आहे. आगरी माणसेही कविता लिहू शकतात. आगरी माणूस यशस्वी संगीतकार होऊ शकतो. चांगल्या चाली लावू शकतो, याचे उत्तमोत्तम उदाहरण म्हणजे ठाकूर यांनी दिलेले संगीत. हे शिवरायांच्या मातीतील संगीत आहे, याचा म्हात्रे यांनी आवर्जून उल्लेख केला.
ठाकूर म्हणाले की, गावी-गावांतील महिला धवला गायच्या. त्यांच्या आवाजाला साथसंगत करण्यासाठी वाद्य नव्हते. त्यामुळे पत्र्याचा डबा वाजवून त्यांच्या गाण्याला साथसंगत करण्यापासून माझ्या संगीत शिक्षणाला सुरुवात झाली. नंतर, अनेक गुरू मला भेटले. संगीतकार मोरे यांच्याकडे मी सहायक संगीतकार म्हणून काम करीत होतो. तसेच संगीत देण्याचे धडे गिरवत होतो. तेव्हा आशा भोसले यांना चाल सांगायची होती. मोरे मास्तरांचा घसा बसला होता. त्यांनी मला चाल सांगायला लावले. गाणे होते ‘तालासुरांची गट्टी जमली’... त्याची चांगली चाल सांगितल्यावर आशाबार्इंनी गाणे ओठातून नाही, तर पोटातून गायचे, असा सल्ला दिला. कारण, आशाबाई मोठ्या असल्याने मी दबक्या आवाजात चाल सांगितली होती. हे गाणे हिट झाले. त्यानंतर, माझा संगीत दिग्दर्शनाचा प्रवास झाला. चाल बसवण्याचा तो माझ्या संगीत कारकिर्दीचा प्रारंभ होता.
पु.ल. देशपांडे यांच्या पंचाहत्तरीनिमित्त त्यांच्या नाटकांचा उत्सव करण्यात येणार होता. तेव्हा ‘तीन पैशांचा तमाशा’ या नाटकासाठी प्रख्यात नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे यांनी मला संगीत देण्यासाठी पाचारण केले. तेव्हा, ‘तू नसल्यावर या वीणेवर गीत कुणाचे गाऊ, एकटी कशी राहू’ या गाण्याला नाटकातील नायिका पांढरपेशी असल्याने सुगम संगीताची चाल लावली. तेव्हा केंद्रे यांनी ही चाल तुझ्याकडेच राहू दे, ती नको. तिचा उपयोग कोणत्या तरी सिनेमात कर. माझ्या नाटकातील नायिका गावरान आहे. त्या अंगाने ती गाणे गाणार आहे. तशी चाल करून दे. मी ते आव्हान स्वीकारले आणि चाल बसवली. त्यावर, केंद्रे यांनी दाद दिली.
विठ्ठल उमप यांच्यासोबत ‘जांभूळ अख्यान’ करताना ‘द्रौपदीला पाहून कर्णाचं मन पाकुळलं’ या शीर्षकगीताला चाल जमत नव्हती. तेव्हा, नाटकासाठी संबळवादक तिथे आले होते. त्यांना संबळ वाजवायला सांगितले आणि त्यांना काहीतरी गाणे गायला सांगितले. त्यांनी ‘गार डोंगरांची हवा’ हे गीत संबळाच्या ठेक्यावर सुरू केले. त्याच ठेक्याच्या शब्दांचा आधार घेत कर्णाला पाहून ‘द्रौपदीचे मन पाकुळंल’ ही चाल सुचली, हा किस्सा ठाकूर यांनी सांगितला.
‘पानापानांत दिसतो कान्हा, फुले तोडू मी कशा सांगा’ हे गीत महागायिका ऊर्मिला धनगर हिने तिच्या अंतिम फेरीत सादर केले होते. ती माझी विद्यार्थिनी, याकडे ठाकूर यांनी लक्ष वेधले. तसेच गझलकार व कवी म.भा. चव्हाण यांची ‘आई उन्हाची सावली, आई उन्हाचे नगर’ ही कविता ठाकूर यांनी गाऊन दाखवली.
ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. नायगावकर यांनी सांगितले की, संमेलनामुळे आगरी संस्कृती सातासमुद्रापार पोहोचली आहे. आगरी माणसाचे कलागुण तांदळाच्या भाकरीसारखे शुभ्र आहेत. तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी समारोपाचे भाषण आगरी बोलीतून करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शिवशाहीर वैभव घरत यांनी, नाना व दि.बा. पाटील यांच्या कार्याची महती सांगणारा स्वरचित पोवाडा सादर केला. सुलभा म्हाडिक यांनी बहिणाबाई यांच्या ‘खोप्यामध्ये खोपा’ या कवितेचे गायन केले. कश्मिरा या गायिकेने ‘झोंबतो गारवा’ ही लावणी सादर केली.