‘आय लव्ह यू कोणी म्हणायचे?’
By Admin | Published: January 24, 2017 03:39 AM2017-01-24T03:39:14+5:302017-01-24T03:39:35+5:30
सध्या सगळ्या गंमतीच्याच गोष्टी सुरु आहेत. दोघांसमोर मोठा प्रश्न पडलाय ‘आय लव्ह यू’ कोणी म्हणायचे?... आपण अजृून
मुंबई : सध्या सगळ्या गंमतीच्याच गोष्टी सुरु आहेत. दोघांसमोर मोठा प्रश्न पडलाय ‘आय लव्ह यू’ कोणी म्हणायचे?... आपण अजृून कुंपणावर आहोत, इकडे की तिकडे ठरलेलं नाही...त्यामुळे दोन दिवस जरा शांत राहा. २६ तारखेला मी सविस्तर बोलणार आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मुंबई महापालिका निवडणुकीत युतीबाबत उद्धव ठाकरे काय बोलणार, याबाबत मेळाव्यातही उत्सुकता होती. सध्या दोन्ही पक्षात रंगलेल्या खेळाचे खुमासदार वर्णन करताना उद्धव म्हणाले, नेमके कुणी ‘आय लव्ह यू म्हणायचे’ असा मोठा प्रश्न सध्या आहे. आज बाळासाहेबांचा जन्मदिन त्यामुळे यावर आज बोलणार नाही. २६ जानेवारी रोजी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात या सर्वांचा सविस्तर समाचार घेईन. सध्या आपण कुंपणावर आहोत, इकडे का तिकडे ठरलेले नाही. त्यामुळे दोन दिवस वाट पाहू’ असे सूचक उद्गार उद्धव यांनी काढत . शिवसैनिकांना तूर्तास संयम बाळगण्याचा सल्ला दिला. सध्या आपण इतरजण आपल्यासोबत वागताना काय काय नाटकं करत आहेत, हे बघून घेऊ. आपण एका निर्णायक टप्प्यावर उभे आहोत. या टप्प्यावर मराठी माणसाने एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. एकजुटीने लढलो नाही तर आपले तुकडे केले जातील. आता पुढे कसे जायचे, हा प्रश्न निश्चितच आहे. मात्र, तुम्ही माझ्यासोबत असाल तर मला कोणताही चिंता नाही, असे उद्धव यांनी सांगितले. मात्र, ज्यांचा माझ्या नेतृत्वावर विश्वास नाही त्यांनी खुशाल बाहेरची वाट पकडावी. मी निष्ठावंतांना घेऊन पुढे जाईन, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. (प्रतिनिधी)