मला भेटलेले पुलं - कौशल इनामदार

By admin | Published: June 14, 2016 09:34 AM2016-06-14T09:34:07+5:302016-06-14T12:08:43+5:30

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे यांची नुकतीच पुण्यतिथी झाली. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी पुलंच्या काही आठवणी खास लोकमतच्या वाचकांसाठी शेअर केल्या आहेत.

I met the Puli - Skill Inamdar | मला भेटलेले पुलं - कौशल इनामदार

मला भेटलेले पुलं - कौशल इनामदार

Next
>महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे यांची नुकतीच (१२ जून रोजी) पुण्यतिथी झाली. २००० साली पुलंचे दीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले. त्याच्या काही काळ आधीच आजच्या काळातील प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांची पुलंशी झालेल्या भेटीची आठवण त्यांनी खास लोकमतच्या वाचकांसाठी शेअर केली आहे...
 
मी २७ वर्षांचा होतो. ताजा फडफडीत संगीतकार! ईन मीन तीन कॅसेटी बाजारात आल्या होत्या. आणि एकाचं ध्वनिमुद्रण झालं होतं. लग्न एका महिन्यावर आलं होतं. 
एके दिवशी सकाळी सकाळी फोन आला. समोरचा माणूस म्हणाला- "मी पु.ल.देशपांडेंचा असिस्टंट बोलतोय. भाई आत्ता जांभूळपाड्याला आहेत आणि गेले दोन दिवस फक्त तुमचीच गाणी ऐकताएत. त्यांना तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे. तुम्ही उद्या जांभूळपाड्याला याल का?"
मी काही या असल्या फोनला भुलणारा नव्हतो. आम्ही कॉलेजमधे असे अनेक फोन केले होते! माझी खात्री होती की आमचाच कोणी मित्र आवाज बदलून फोन करतोय. एक - पुलं आपली गाणी कुठून ऐकणार? आणि 'फक्त' आपली?? बरं बोलवलंय कुठे? तर जांभूळपाडा?!!! 
मी म्हटलं आपणही खेळू हा खेळ! 
"मला ऐकून आनंद झाला. पण माझं १५ दिवसात लग्न आहे तर तुम्ही पुलंना सांगाल का की मला वेळ नाही?"
माझं बोलणं ऐकून तो इसम म्हणाला - "अरेरे, नाही का वेळ? भाईंची खूप इच्छा होती हो तुम्हाला भेटायची!"
या वाक्याने तर माझी खात्रीच पटली की हे सगळं सोंग आहे! 
दिवसभरात मी हा फोन विसरलो आणि माझ्या कामात गुंतलो. 
दुपारी ४ वा. पुन्हा फोन वाजला. मी फोन उचलला तर पुन्हा तोच आवाज. 
"एक मिनीट हं. भाई बोलताएत तुमच्याशी!"
समोरून "हॅलो" ऐकू आलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण पु.लं. देशपांडेंचा आवाज तर मी ओळखत होतो. 
"मी तुमची गाणी ऐकली आणि आवडली ती मला. तुम्ही आला असता जांभूळपाड्याला तर आनंद झाला असता मला. तुमचं लग्नगाठ आहे आत्ता असंही कळलं! दोघे आलात तर आशीर्वादही देईन!"
इतकं ओशाळल्यासारखं मला आयुष्यात झालं नव्हतं! 
दुसऱ्या दिवशी मी, सुचित्रा आणि आमचा मित्र परीक्षित असे तिघे जांभुळपाड्याच्या वृद्धाश्रमात पोहोचलो. पुलंची तब्येत बरी नव्हती आणि ते विश्रांतीसाठी तिथे आले होते. त्यांनीच दिलेल्या देणगीतून हा वृद्धाश्रम उभा राहिल्याचं मला माहित होतं. 
त्यांच्या असिस्टंटने आम्हाला त्यांच्या खोलीत नेलं. खरोखर त्यांच्या उशाला माझ्याच कॅसेट्स होत्या. मला किती भरून आलं असेल याची कल्पना आली का तुम्हाला? 
त्यानंतर तासभर पुलंनी माझं एक-एक गाणं माझ्यासोबत ऐकून त्या त्या गाण्यात त्यांना काय काय आवडलं ते तपशीलवार सांगितलं. त्यांच्या प्रतिक्रिया अतिशय मार्मिक होत्या. 
झाल्यावर त्यांनी खूप चौकशी केली. किती कार्यक्रम झाले? लोक येतात का? पैसे देतात का? कवितांना चाली द्याव्याशा का वाटलं? त्यांच्या प्रश्नांमध्ये आत्मीयता होती. त्यांच्या एका प्रश्नाला मी उत्साहाच्या भरात म्हटलं -
"मला काहीतरी वेगळं करायचं होतं"
त्यावर त्यांनी अलगद माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले-
"तुम्ही चांगलं करा. वेगळं आपोआप होईल." 
**
मला एका क्षणात अख्ख्या आयुष्याकडे बघायची एक नवी दृष्टी मिळाली आणि ती पुलंनी दिली यात शंका नाही. 
**
त्यांचं लिखाण चिरंतन असेल किंवा नसेल. पण एखादा नवा गीतकार होऊ पाहणारा मुलगा भेटायला येतो आणि त्याच्या दातांत मला छापखान्यातले खिळे दिसू लागतात. माझ्या कुठल्याही कार्यक्रमाच्या वेळी अखंड काम करणाऱ्या मंदार गोगटेकडे पाहून 'नारायण' आठवतो. पार्ल्यात गेलं आणि श्रद्धानंद रोडची  पाटी पाहिली की रस्त्यात महाराष्ट्राच्या भूगोलात शिरलेला तो 'थेरडा' आठवतो. वरच्या फ्लॅटमधून ठोकण्याचे आवाज आले की 'कुटील शेजारी' आठवतात. पुण्यातल्या दुकानात शिरलं की 'सर्वात दुर्लक्ष करण्यासारख्या' गोष्टीसारखं वाटू लागतं. असं बरंच. अचानक पाणी गेलं की आपल्या कुंडलीत जलःश्रृंखला योग आहे का अशी शंका येते. 
'पुलं' माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगात त्यांचं एक तरी वाक्य आठवतं आणि प्रसंगी तारूनही नेतं. हे भावनिक नाही, अनुभवातून आहे. 
शेवटी एकच. माणसाचं काम चिरंतन आहे की नाही हे काळ ठरवतो. माणूस नाही.⁠⁠⁠⁠

Web Title: I met the Puli - Skill Inamdar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.