राज ठाकरेंना भेटलो. पण् आघाडीत या असं कधीही म्हटलं नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 04:00 PM2019-03-11T16:00:04+5:302019-03-11T16:04:09+5:30
मी राज ठाकरे यांना भेटलो मात्र आघाडीत या असं कधीही म्हटलं नसल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला.
पुणे : मी राज ठाकरे यांना भेटलो मात्र आघाडीत या असं कधीही म्हटलं नसल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला.
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यावर आघाडी आणि युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातही तुलनेने लहान मानल्या जाणाऱ्या एमआयएम, भारिप, मनसे या पक्षांना स्वतःच्या गटात खेचण्यासाठी मोठ्या पक्षांची स्पर्धा लागली आहे. त्यातच राज ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसला साथ असणार असल्याची चर्चा आहे. या बाबत जागा वाटपाचा खल सुरु असल्याचे बोलले जात आहे. मात्र पवार यांनी याबाबत असे काहीही नसल्याची भूमिका घेतल्याने संदिग्धता निर्माण झाली आहे.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले की, 'राज ठाकरेंना मी भेटलो मात्र त्यांना आघाडीत या' असा आग्रह केलेला नाही. यावेळी राज ठाकरेंचे भाषण बारामतीवरून पढवलेले होते असा आरोप केलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांना त्यांनी उत्तर दिले आहे. पढवणं ही बारामतीची परंपरा आहे अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले. बारामतीची ही परंपरा पेशवे काळापासून असून मोरोपंत बारामतीचे होते अशी आठवणही त्यांनी करून दिली.
या पत्रकार परिषदेत पवार म्हणाले की,
- मी माढ्यातुन निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. पण् पक्षाने माझी उमेदवारी जाहीर केलेली नाही.
- आम्ही कुटुंबात बसून चर्चा केली. मी स्वत: उभं न राहता नव्या पिढीला संधी द्यायचं ठरवलं.
- पार्थ पवारला उमेदवारी द्यावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्यामुळे एका घरातील किती उमेदवार द्यायचे असा प्रश्र्न होता.त्यामुळे मी पार्थला संधी द्यायचं ठरवलं.
- मी आतापर्यंत चौदा निवडणूका लढलोय. काहींनी बातमी चालवली की मी माघार घेतली. चौदा निवडणूकांमधे मी माघार घेतलेली नाही.
- नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. या मतदारसंघात सहापैकी दोन आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. कॉंग्रेसचा एकही आमदार नाही. आम्हीच या मतदारसंघातुन बाळासाहेब विखे-पाटील यांचा पराभव केला होता. विखे-पाटील भाजपमध्ये जातील असं वाटतं नाही. त्यांच्या कॉंग्रेस निष्ठेबद्दल माझ्या मनात शंका नाही.
- महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणूक होतेय. त्यामुळे आम्हाला प्रचाराला वेळ मिळेल.