मी इतिहासालाच प्रमाण मानतो, कादंबरीला नाही : आशुतोष गोवारीकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 06:00 AM2019-12-04T06:00:00+5:302019-12-04T06:00:07+5:30
पानिपताचे आकर्षण जुनेच
पानिपत हा प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात घर करून बसलेले अडीचशे वर्षांपूर्वीचा घनघोर रणसंग्राम. बखरकाराने त्याची तुलना महाभारत युद्धाशीच केली आहे. अशा या विषयावर ' पानिपत ' चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्याबरोबर केलेली बातचीत...
राजू इनामदार -
प्रश्न - चित्रपट तयार करताना पानिपत कादंबरीतील काही भाग विनापरवानगी घेतल्याचा आरोप होत आहे. नक्की काय आहे?
गोवारीकर - ऐतिहासिक विषयांवर चित्रपट तयार करताना नेहमी मी इतिहासाचाच आधार घेतो. त्यामुळे कांदबरी किंवा ललित स्वरूपातील काही वाचण्यापेक्षा संशोधनपूर्वक साकार झालेला एखादा संदर्भ ग्रंथ अभ्यासणे योग्य असे मला वाटते. त्यानुसार मी त्र्यंबक शेजवलकर यांचा पानिपत हा ग्रंथ आधारभूत धरला आहे. या शिवाय पुण्यातीलच इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्याकडून थेट पेशवे दप्तरात असलेल्या पानिपत संबधीच्या पत्रांचे दाखलेही घेण्यात आले आहेत. कादंबरी व चित्रपट हे दोन वेगवेगळे कलाप्रकार आहेत व ते दोन्ही इतिहासाचा आधार घेत तयार होतात, मग मी कांदबरीचा आधार कशासाठी घेऊ. त्यामुळे याबाबत होत असलेल्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही.
प्रश्न - पानिपतच का? चालणारा विषय आहे म्हणून की इतिहासप्रेम?
गोवारीकर - पानिपत या विषयात फार मोठा संघर्ष दडलेला आहे. तो मला अनेक वर्षांपासून साद घालत होता. हे सगळे मोठ्या पडद्यावर यायला हवे, असे एक दिग्दर्शक म्हणून अगदी आतून वाटत होते, मात्र विषयाच्या एकूण विस्तारामुळे धाडस होत नव्हते. अखेर हातातील इतर काही प्रकल्प संपल्यानंतर याला वेळ द्यायचा, असे ठरवले व काम सुरू केले. ही फक्त लढाई नाही किंवा इतिहासही नाही तर, त्यापेक्षा जास्त काय आहे तेच पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रश्न - संहिता कशी तयार केली? त्यासाठी कशाचा अभ्यास केला?
गोवारीकर - दोन वर्षांपासून मी संहिता तयार करत होतो. एकदा संहिता तयार झाली की मी त्यात कधीही फारसा बदल करत नाही. त्यामुळे काय करायचे आहे ते संहितेत पक्के केलेले असते. त्यामुळेच इतक्या मोठ्या चित्रपटाचे चित्रिकरण मी १२५ दिवसांत पूर्ण करू शकलो.
प्रश्न - इतका मोठा पट तीन तासांत कसा बसवला?
गोवारीकर - पानिपत मोहिमेत जवळपास ५०० व्यक्तिरेखा आहेत. सगळे घ्यायचे म्हटले तर किमान १५ तासांचा चित्रपट झाला असता. त्यामुळेच काय घ्यायचे यापेक्षाही काय घ्यायचे नाही याचाच आम्हाला जास्त विचार करावा लागला. काही भाग वगळणे आवश्यक होते. त्यामुळे युद्ध व त्या अनुषंगाने येणारे काही प्रसंग व घटना अशा पद्धतीने संहिता तयार केली. तरीही प्रमुख व्यक्तीरेखांसमवेत चित्रपटात १२५ पेक्षा जास्त लहानमोठी पात्र आली आहेत.
प्रश्न - तो काळ उभा करणे कठीण गेले का?
गोवारीकर - तंत्रज्ञानामुळे काही गोष्टी सोप्या झाल्या आहेत, हे खरे असले तरी दागिने, शस्त्रास्त्रे, कपडे, त्यात पुन्हा पद, कामानुसार असलेले प्रकार वेगवेगळे हे सगळे काळानुरूप तयार करावे लागते. त्यासाठी स्वतंत्र विभाग होते. त्या सर्वांचे फार सहकार्य झाले. पानिपतचा युद्धकाळ हा मराठा साम्राज्याचा देशातील समृद्ध काळ होता. त्यामुळे दागदागिने, पैसाअडका याची काही कमी नव्हती. त्यातच मराठी साम्राज्याचा दरारा त्या काळात सगळ्या हिंदुस्थानात पसरला होता. व्यापार उदीम व्यवस्थित सुरू होता. त्यामुळे अन्य राज्यातील, प्रदेशातील संस्कृती ही आपल्या संस्कृतीत मिसळली होती. ते सगळे दाखवायचे म्हणजे त्या-त्या विभागाचा अभ्यास असणारी माणसे हवी होती. सुदेर्वाने असे अभ्यासू लोक मिळाले व पानिपत साकार झाला.
प्रश्न - त्यावेळच्या व्यक्तीरेखा कशा आकाराला आणल्या?
गोवारीकर - अब्दाली दिसायचा कसा? भाऊसाहेब कसे दिसत असतील? पेशव्यांचा दरबार कसा असेल? असे अनेक प्रश्न होते. इतिहासाच्या अभ्यास, तकार्तून तर काही वेळा कल्पनेने या प्रश्नांची उत्तरे मिळत गेली. त्यात इतिहासाचा विपर्यास होणार नाही याची काळजी घेतली. त्याप्रमाणे लोकेशन्स शोधली, सेट तयार केले. ऐतिहासिक चित्रपटांसाठी हे सगळे करावेच लागते.
प्रश्न - चित्रिकरण करताना सोपे काय होते व अवघड काय होते?
गोवारीकर - खरे सांगायचे तर सोपे काहीच नव्हते. सगळे अवघडच होते. युद्ध दाखवायचे म्हणजे फारच कठिण होते. जरी युद्ध एका दिवसात झालेले असले तरी त्याची तयारी बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. ते कसे दाखवायचे, युद्धात असंख्य प्रकारची हत्यारे वापरण्यात आली. ती कोणती व कशी दाखवायची असे बरेच प्रश्न होते, मात्र ते सुटले व पानिपत साकार झाला. आता त्याला कसा प्रतिसाद मिळतो याची उत्सुकता आहे.