‘रेल के सफर में तुझे सुरक्षित जाते देखा!’; बोर्डीतील शेतकऱ्याच्या कवितेची रेल्वेमंत्र्यांकडून दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 12:25 AM2021-03-26T00:25:37+5:302021-03-26T00:26:12+5:30
पीयूष गोयलांचे ट्विट, किसान रेल्वेमुळे डहाणूतील शेतकऱ्यांना झालेला आनंद, बोर्डीतील बागायतदार प्रीत पाटील यांनी कवितेतून मांडला. या कवितेत चिकू फळाला आरामदायी गादीवरून प्रवास करण्याची संधी मिळाली,
अनिरुद्ध पाटील
बोर्डी : रेल के सफर में तुझे सुरक्षित, संभलकर जाते देखा, व्यापारियों के हौसला में बदलाव आते देखा... भारतीय रेल्वेने किसान रेल्वेच्या माध्यमातून डहाणू तालुक्यातील उत्पादित चिकू फळ दिल्ली बाजारपेठेत कमी वेळेत व उत्पादन खर्चात पोहोचत असून, बागायतदारांच्या जीवनात बदल घडवला आहे, अशी भावना व्यक्त करणाऱ्या बोर्डीतील बागायतदाराच्या कवितेची दखल रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी घेत ती ट्विट केली आहे. त्यानंतर या कवितेची चर्चा देशभर होत आहे.
किसान रेल्वेमुळे डहाणूतील शेतकऱ्यांना झालेला आनंद, बोर्डीतील बागायतदार प्रीत पाटील यांनी कवितेतून मांडला. या कवितेत चिकू फळाला आरामदायी गादीवरून प्रवास करण्याची संधी मिळाली, गाडीत बसल्यानंतर खिडकीनजीक बसण्याचा आनंद लुटता येण्याबाबतचा उल्लेख आहे. ट्रकमधून उघड्यावर प्रवास करणाऱ्या चिकूला रेल्वेच्या डब्यातून सुरक्षित व आरामदायी प्रवास होऊ लागला. बाजारात पोहोचेपर्यंत फळाचा दर्जा चांगला राहणार आहे. व्यापाऱ्यांच्या दृष्टीनेही हे महत्त्वपूर्ण असल्याचे वर्णन कवितेत केले आहे. पाटील यांनी कविता बागायतदारांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पोस्ट केली. कृष्णा नावाच्या शेतकऱ्यामार्फत रेल्वे अधिकारी आणि त्यानंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यापर्यंत ही कविता पोहोचली. बागायतदारांच्या जीवनात या विशेष गाडीचे महत्त्व अधोरेखित करीत असल्याचे त्यांनी ट्विटमधून मांडले असून, त्यानंतर देशभर कवितेवर चर्चा सुरू झाली आहे.
रेल्वेने वाहतूक केल्यास खर्च येतो कमी
रेल्वेतर्फे जानेवारीपासून डहाणू रोड ते दिल्ली स्थानकापर्यंत चिकूफळे निर्यातीसाठी सहा डब्यांची सुविधा उपलब्ध केली. तर गेल्या आठवड्यापासून पश्चिम रेल्वेने सहाऐवजी १२ डबे देत बागायतदारांना बोनस दिला आहे. डहाणू घोलवड भौगोलिक मानांकनप्राप्त चिकू २२ तासांत दिल्ली बाजारपेठेत पोहोचत आहेत. ट्रकद्वारे वाहतुकीला लागणाऱ्या आठ ते नऊ रुपये प्रति किलो खर्चाच्या तुलनेत रेल्वेने वाहतूक केल्यास दोन रुपयांपेक्षा कमी खर्च येतो. आठवड्यातून तीन वेळा ही विशेष शेतमाल घेऊन जाणारी गाडी डहाणू रोड स्थानकातून सोडली जाते.
चिकूफळ निर्यातीला रेल्वे सुविधा निर्माण झाल्याने, डहाणूतील बागायतदारांच्या जीवनात घडलेल्या भावना कवितेतून मांडल्या. सोशल मीडियाद्वारे त्या रेल्वेमंत्र्यांपर्यंत पोहोचून त्याची दखल घेतली. शासनाच्या निर्णयाने शेवटच्या घटकापर्यंत, जीवनात होणारे बदल यातून व्यक्त होतात. - प्रीत पाटील, चिकू बागायतदार, बोर्डी