कविता उशाशी घेऊन झोपलो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2023 02:41 PM2023-08-04T14:41:55+5:302023-08-04T14:42:47+5:30
महानोर या शब्दातच एक जादू होती. या कवीचे असणे हे अनेकांना धीर देणारे, बोलके करणारे असायचे.
श्रीकांत देशमुख, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी -
‘जन्मभराचे दुःख, जन्मभर असो’ असेच काहीसे म्हणणारा एक महान रानकवी आज भर पावसाळी दिवसात दिगंतात उडून गेला. महानोर या शब्दातच एक जादू होती. या कवीचे असणे हे अनेकांना धीर देणारे, बोलके करणारे असायचे.
दहावीत असताना पहिल्यांदा पाठ्यपुस्तकातून भेटलेला हा रानकवी माझ्यासारख्या शेतकरी तरुणांचा सखा झालेला. रानातल्या कविता मी जालन्याच्या कॉलेजात शिकायला असताना उशाशी घेऊन झोपायचो. एखादा कवी त्याच्या कवितेसह आपला वाटणे ही जादू केवळ महानोर या नावातच होती. त्यांची कविता ऐकून मन भरून येत असे. या कवितेने दिलेली ग्लानी मग कित्येक दिवस पुरायची. या कवीने मला काय दिले? खूपदा विचार करतो मी. माझ्या कवितेला आपले असे स्वत्व असायला हवे, हे मला याच कवीने शिकवले. माझी ‘बळीवंत’ मधली कविता वाचून दादा म्हणायचे, तुझी कविता ही माझ्या कवितेचा सघन विस्तार आहे. ही खास तुझी कविता आहे. शेती मातीतली. शेतीचे दुःख कवितेतून येणार नसेल तर तो कवी कामाचा नाही.
पळसखेडचे दादांचे शेत म्हणजे एक प्रयोगभूमी. मोसंबी, सीताफळ, पाणी अडवणे, शेत बंधारे असे कितीतरी प्रयोग दादांनी खूप तळमळीने केलेले. कवितेच्या पुढे जाऊन कुणब्यांच्या जगण्यात उजेड यावा, याची मागणी करणारा, प्रार्थना करणारा हा कवी. कोणालाही कशाची मागणी न करणारा हा कवी मराठी समाजाला समृद्धी देत गेला.