पंतप्रधानांना मी अजूनही शत्रू मानत नाही, ते मला मानतात; उद्धव ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 01:13 PM2024-02-05T13:13:37+5:302024-02-05T13:15:03+5:30

मिंद्यांच्या वडिलांची किंमत नाही म्हणून ते माझे वडील चोरतायेत. त्यांना माझ्या वडिलांची किंमत कळाली पण चव्हाण तुम्हाला कळाली नाही असा घणाघात ठाकरेंनी राजन साळवींची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर केला. 

I still do not consider the PM as an enemy, he considers me; Uddhav Thackeray | पंतप्रधानांना मी अजूनही शत्रू मानत नाही, ते मला मानतात; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पंतप्रधानांना मी अजूनही शत्रू मानत नाही, ते मला मानतात; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रत्नागिरी -  Uddhav Thackeray on BJP ( Marathi News ) जोपर्यंत संधी मिळाली आहे तोपर्यंत गोडीगुलाबीत आनंदाने भोगा. पंतप्रधानांना मी अजूनही शत्रू मानत नाही. ते मला मानतायेत. कारण त्यांनी आपली शिवसेना फोडली, ज्या बाळासाहेबांनी त्यांना त्यांच्या संकटकाळात मदत केली त्या बाळासाहेबांची चोरी केली. चोराला मदत केली. त्याला मुख्यमंत्री बनवलं. तिकडे नीतीश कुमारांना फोडले. हेमंत सोरेनला तुरुंगात टाकलं. केजरीवालांच्या मागे लागले. माझ्या राजन साळवी, रवींद्र वायकर, किशोरी पेडणेकर, सूरज चव्हाण, अनिल परब आहेत त्यांना त्रास दिला जातोय. असं आम्ही तुमची लफडी काढली, आता ते येतायेत आमच्याकडे, त्यांच्यावर कारवाई करणार की नाही असं उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना विचारले आहे. 

राजापूर तालुक्यातील जवाहर चौकात उद्धव ठाकरेंची जनसंवाद सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले की,  सब का साथ म्हणजे भ्रष्टाचारांची साथ आणि मेरे दोस्तो का विकास ही नवी घोषणा भाजपाने द्यावी. लोकांनी डोक्याने विचार करावा. विनायक राऊतांना लोकांनी दोनदा निवडून दिले नाहीतर इथेही गुंडागर्दी वाढली असती. आता पंतप्रधानांसमोर प्रश्न आहे की, गद्दार, गुंड घराणेशाहीला तुम्ही रोखणार आहे की नाही. हे या निवडणुकीत कळेल. मी लढायला तुमच्यासाठी उभा आहे. जातपात धर्म, मुस्लीम, ख्रिश्चन माझ्यासोबत येतात. देशप्रेमी म्हणून एकत्र येऊया. देशावर जे संकट येतंय ते गाडून टाकूया असं त्यांनी सांगितले. 

तसेच मी माझं सांगण्याचं काम करतोय. देशभरात सरकारच्या कारभाराचे चटके बसतायेत. तरीदेखील मूळ मुद्दे बाजूला ठेऊन एक वेड पांघरायचं, त्यातून सगळ्यांना वेडं करायचे आणि पुन्हा सत्तेत यायचं. राजनची पाठ थोपटायला मी इथं आलोय. संकटाच्या काळात आपलं कोण आणि परकं कोण हे कळतं. राजन साळवीच्या घरी धाड टाकली. इथं घरातील प्रत्येक वस्तूची किंमत लावली. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत लावता? ५ हजार रुपये. चव्हाण तुमची किंमत लावा, माझ्या महाराजांच्या मूर्तीची किंमत ५ हजार करता, तुम्हाला शरम वाटत नाही. कोणत्या कुळात जन्मला, कोण आहेत तुमचे पूर्वज?, कोणाची चाकरी करताय? या नतद्रष्ट माणसांची ओळखली पाहिजे. तुमच्या सात पिढ्या जन्मल्या तरी महाराजांची किंमत करू शकत नाही. तुमच्यात हिंमत असेल तर राजन साळवीला आतमध्ये टाका. तुमच्या घरातील आई वडिलांची किंमत कुणी केली तर चालेल का? छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, बाळासाहेब ठाकरे हे वडील आहेत. मिंद्यांच्या वडिलांची किंमत नाही म्हणून ते माझे वडील चोरतायेत. त्यांना माझ्या वडिलांची किंमत कळाली पण चव्हाण तुम्हाला कळाली नाही असा घणाघात ठाकरेंनी राजन साळवींची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर केला. 

लांडगेगिरी सरळ केल्याशिवाय राहणार नाही

राजन साळवी मिंदेकडे आणि भाजपात गेले नाही म्हणून त्रास दिला जातोय. कितीही काही केले तरी हा मावळा झुकणार नाही. दिवस बदलत असतात. आज दुर्दैवाने त्यांचे दिवस आहेत. परंतु जर त्यांचे दिवस फिरले तर तुमचेही दिवस फिरतील हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे. ही नोंद आम्ही घेतलीय. उद्या त्यांचे दिवस फिरल्यावर तुमचे दिवस आणखी वाकडे होतील. सरकार येते आणि सरकार जाते. आजपर्यंत देशात अनेक पंतप्रधान झाले. राज्यात अनेक मुख्यमंत्री झाले. पण कुणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन येत नाही. ना कुणी आयुष्याचा अमरपट्टा घेऊन येते. सत्ता येते आणि जाते. पण लांडग्यासारखी तुम्ही कुणाची लाचारी करणार असाल तर तुमची लांडगेगिरी काय आहे ही सरळ केल्याशिवाय राहणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. 

एखादी व्यक्ती टोकाची भूमिका का उचलतो?

राजापूरात जो कुणी इच्छुक म्हणून तयारी करतोय त्यांच्या घरी पहिली धाड टाका. कुठून आणले पैसे? जाहिराती करतायेत. प्रत्येक गोष्टीत पैसे काढतायेत त्याची चौकशी करा. जर कुणी तक्रार केली म्हणून तुम्ही राजन साळवींच्या घरात घुसणार असाल तर परवाच भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केलाय. परंतु त्यांनी आणखी एक विधान केलेय, या मिंदेकडे गायकवाडांचे कोट्यवधी रुपये आहेत. मग अनिल देशमुखांना तुम्ही आतमध्ये टाकले. या आमदाराने पोलीस ठाण्यात गोळीबार केला. पुरावे आहेत काय केले ते दिसते मग ते बोलला ते का दिसत नाही. मिंदेंच्या घरी धाड का टाकली जात नाही. एवढे ढळढळीत आरोप सत्ताधारी पक्षाचा आमदार करत असेल तर त्यालाही काही किंमत नाही. मग इथे जमलेले भाजपाचे लोक असतील ते कुणासाठी काम करताय, भाजपा आमदाराची दयनीय अवस्था झाली असेल, हातात पिस्तुल घ्यावे लागले असेल आणि गोळीबार केल्यानंतर का गोळी झाडली हे सांगत असतील. तरीही आमदारावर कारवाई करा. त्याची बाजू घेत नाही. पण एखादी व्यक्ती एवढी टोकाची भूमिका का उचलतो हे पोलिसांनी सांगावे. ज्या पोलीस स्टेशनच्या आवारात आमदाराच्या मुलाला धक्काबुक्की झाली ते सहन न झाल्याने एक बाप म्हणून त्याने गोळीबार केला. मग ही धक्काबुक्की कोणी केली, मुद्दाम डिवचण्याचा प्रकार झाला. मग पोलीस का गप्प होते. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत. भाजपाच्या एकाही व्यक्तीने यावर प्रतिक्रिया दिली? तुमच्या पक्षाचा आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करतोय, जोपर्यंत हा मुख्यमंत्री असेल तोपर्यंत राज्यात गुंडांची पैदास होईल असं आमदार सांगतोय अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली. 

दरम्यान, तोफगोळ्यांबाबत करार मोडून इंग्रजांनी सिद्धी जोहरला मदत केली म्हणून छत्रपती शिवाजी महाराज इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी  राजापूरात आले होते. आता जे कुणी आमच्यावर चालून येणारे लोक आहेत, त्यांना मदत करणाऱ्यांचे नंतर आम्ही काय करू त्याचं छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा साक्षात मूर्तीमंत उदाहरण आहे असा इशाराही ठाकरेंनी दिला. 
 

Web Title: I still do not consider the PM as an enemy, he considers me; Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.