"मी मंत्र्यांशीच बोलतो'; भाषण करताना भास्कर जाधवांना नितेश राणेंनी टोकलं, मग..
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 12:37 PM2022-08-18T12:37:01+5:302022-08-18T12:37:47+5:30
विधानसभेत कोकणातील रस्त्यांबाबत प्रश्न उपस्थित झाला असताना त्यावेळी आमदार भास्कर जाधव आणि आमदार नितेश राणे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले.
मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून विधानसभेत आज शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यात शाब्दिक युद्ध पेटल्याचं दिसून आले. सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासावेळी ही घटना घडली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मध्यस्थी करत सभागृहाचं कामकाज वेळेनुसार करण्याची सूचना जाधवांना दिली.
विधानसभेत आमदार भास्कर जाधव सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला. प्रश्नोत्तराच्या तासात कोकणाच्या प्रश्नावर जाधव म्हणाले की, आम्ही आमचं योगदान दिले आहे. देतोय. कुठेही अडचण नाही. आम्ही कितीही प्रश्न विचारले तरी उत्तर तेच राहणार आहे. आम्ही प्रश्न विचारून थकलोय पण तुमचे अधिकारी म्हणजे सरकारचे अधिकारी तेच तेच उत्तर देऊन थकले नाही. परशुराम घाट, लोकांच्या कोर्टकचेरीचा आकडा कायमचा आहे असं त्यांनी म्हटलं.
भास्कर जाधव भाषण करत असताना आमदार नितेश राणे यांनी मध्येच टोकलं तेव्हा जाधव चिडले. तुम्हाला मला विचारायची आवश्यकता वाटत नाही. मी सरकारशी बोलतोय. चला ओ..मी मंत्र्याशीच बोलतो. त्यावेळी अध्यक्षांशी बोला असं राहुल नार्वेकर म्हणाले. तेव्हा अध्यक्षांशीच बोलतोय. जरा शिकवा असं सांगत भास्कर जाधव यांनी भाषण सुरू ठेवले. गणपतीसाठी कोकणातील रस्ते दुरुस्त करण्याबाबत भास्कर जाधव यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता.
गणपतीसाठी कोकणवासियांसाठी कसा सुसज्ज प्रवास होईल याला प्राधान्य द्यायला हवं. बाकी सगळ्या गोष्टी जुन्या आहेत. मंत्री आपण स्वत: कधी प्रवास करताय? कधी जाताय हे सांगा. पनवेल ते इंदापूर नवीन कंत्राटदार नेमतोय असं उत्तरात सांगितले. आज १८ तारीख आहे. ३१ तारखेला गणपती आहे. एजन्सी कधी नेमणार? आता फार उशीर झालाय. या गोष्टी लक्षात घेता तात्काळ लक्ष घालावं असंही भास्कर जाधव म्हणाले. त्यावेळी विरोधकांनी अडीच वर्ष फुकट गेली असा टोला लगावला. त्यावर अडीच वर्ष फुकट गेली म्हणता मग चंद्रकांतदादांची ५ वर्ष आणि नितीन गडकरींची १० वर्ष फुकट गेली असं म्हणायचं का? असं प्रत्युत्तर दिले.