मला वाटते पाटोळेंच्या गावात, त्यांना वाटते थोरातांच्या गावात; उद्धव ठाकरेंनी उज्ज्वला योजनेचा 'गेम' सांगितला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 09:05 PM2023-04-16T21:05:06+5:302023-04-16T21:07:19+5:30
Vajramuth Sabha in Nagpur: सत्ता पाहिजे ना चला आम्ही देतो तुम्हाला. बसलेलेच आहात पण अधिक चांगल्या पद्धतीने देतो. पण गेले आठ वर्षे काय केले हे सांगा मगच देतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
नागपुरातील वज्रमुठ सभेमध्ये माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या योजनांतून तुम्हाला फसविले जात असल्याचा आरोप केला.
आता मला कोणताही माइकालाल मैदानात रोखू शकणार नाही; अनिल देशमुखांचे ईडी कारवाईवरून आव्हान
उद्धव ठाकरे वज्रमुठ सभेत बोलत होते. सत्ता पाहिजे ना चला आम्ही देतो तुम्हाला. बसलेलेच आहात पण अधिक चांगल्या पद्धतीने देतो. पण गेले आठ वर्षे काय केले हे सांगा मगच देतो. सरकारच्या योजना, पीक विमा योजना किती लोकांच्या खात्यात आलेत, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. तुम्ही कसे फसले जाताय हे लक्षात येतेय ना असे विचारत ठाकरेंनी योजनांचा खेळ कसा असतो ते सांगितले.
उज्ज्वला योजनेचे पंतप्रधानांचे पोस्टर प्रत्येक ठिकाणी लागलेले असतात. उज्ज्वला योजना कुठे कुठे सुरु आहे. मला वाटते पाटोळेंच्या गावात सुरु आहे. पाटोळेंना वाटते थोरातांच्या गावात सुरु आहे. थोरातांना वाटते अजित पवारांच्या गावात सुरु आहे. पण जेव्हा आम्ही एकत्र भेटतो तेव्हा आम्हाला कळते कोणाच्याच गावात नाहीय, पण या बाबाचे सगळ्याच गावात पोस्टरबाजी सुरु आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
आपल्या राज्यातलेच घ्या ना, आनंदाचा शिधा किती लोकांना मिळाला? महाराष्ट्रातच राहता ना, ज्यांना मिळाला असेल त्यातल्या कडधान्यालाही बुरशी लागली आहे. सगळ्यालाच बुरशी लागली आहे. आम्ही लढतोय तुमच्यासाठी, असा आरोप ठाकरे यांनी केला.
महागाई, बेकारीचे चटके तुम्हाला लागू नयेत यासाठी धार्मिक गोष्टींचे राजकारण केले जातेय. हे बुरख्याच्या आत चाललेय ते पहा. याविरोधात वज्रमुठ दाखवा. या मैदानात खुर्च्यांशिवाय काही भाड्याने आणलेले नाहीय, असेही ठाकरे म्हणाले.